नांदेड : नवरा-बायकोच्या संदर्भातील अनेक गोष्टी आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. आता बायकोसाठी नवऱ्याने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्याची घटना नांदेडमध्ये घडली. बायको सासरी म्हणजे नांदायला येत नाही म्हणून नवऱ्याने चक्क उंच पाण्याच्या टाकीवर चढून अनोखे आंदोलन केले. शोले चित्रपटातील धर्मेंद्र म्हणजेच वीरुने बंसतीसाठी केलेल्या आंदोलनाची आठवण यानिमित्ताने स्थानिकांना झाली.
नांदेड शहरातील देविदास बलदेवसिंग सिबिया (वय ३०) रा. बेदांतनगर, नांदेड या तरुणाने बायको नांदायला येत नसल्याने पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. देविदास सीबिया याचे लग्न रेखा याच्याशी झाले आहे. त्याला तीन मुलंही आहेत. मागच्या काही दिवसापांसून पत्नी त्याच्यासोबत रहात नाहीत.त्यामुळे तो नैराश्यात आला. त्याने आपली बायको आणि मुलांना बोलावण्यासाठी नांदेडमधील शोभानगर येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शोले स्टाईल आंदोलन केले. बायको व मुलांना बोलवा अन्यथा, टाकीवरून खाली उडी मारू असा इशारा तो देत होता.
स्थानिक नागरिकांनी सिबिया पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती विमानतळ पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या तरुणास खाली येण्यासाठी विनंती केली. मात्र तो येण्यास तयार नव्हता. जोपर्यंत बायको आणि मूल घरी येणार नाहीत तो पर्यंत आपण खाली येणार नाही असे तो सांगत होता. अखेरी मोठ्या समजूतीनंतर तो टाकीवरुन खाली उतरला.