मी जेवढा कडवट हिंदुत्ववादी आहे तेवढाच कडवट मराठी आहे – राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कसब्यात जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली. राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट देताना त्यांनी त्याकडे पाहिलं देखील नाही, अशा लोकांना तुम्ही मत देणार का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांनी आज पुण्यात सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले की, ‘गेले अनेक वर्ष राजकारणामुळे अनेक ठिकाणी फिरत आलो. लोकांना भेटत आलो. माझ्यासाठी कसब्याचं खूप महत्त्व आहे. मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो. तेव्हा महाराष्ट्र दौरा सुरु केला. त्यानंतर पक्षाची स्थापना केली. तेव्हा कसबा गणपतीला येऊन पूजा केल्यानंतर पक्षाची स्थापना केली होती. कधीतरी इतिहासात डोकावून पाहा. आपण लाचार नाही आहोत. आज महाराष्ट्राची काय अवस्था आहे.’
‘महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पहिली आत्महत्या उमरखेडमध्ये झाली. हे सांगितल्यानंतर तेव्हा तेथील लोकांनी टाळ्या वाजवल्या. माणुसकी कशी जपायची असते हे परदेशात जाऊन पाहा म्हणजे कळेल. कुत्र्याच्या बाबतीत एक देश कायदा करु शकतो आणि आपण माणुसकीच्या गोष्टी करतो. चालायला जागा नाही. कुठलीही शिस्त नाही. राजकारण्यांनी याला शिस्त लावण्याचा प्रयत्नही केला नाही.’
‘एकदा विचार करुन बघा. इतक्या वर्षापासून आपण निवडणूका लढवत आहोत. यातून काय बदल होतोय. शहर चांगलं होतंय की खराब होतंय. मेट्रो येऊन शहर मोठं नाही होत. यासाठी यंत्रणा लागते. पुणे हे आता एक राहिलेले नाही. पाच पाच पुणे तयार झालेत. नगरसेवक येतील, आमदार येतील पण कोणी एकत्र येऊन काही काम करत नाही. कोणतीही यंत्रणा राहिलेली नाही. फक्त राजकीय खेळ सुरु आहेत. गेल्या पाच वर्षात काय सुरुये राज्यात बघा.’
‘सत्तेतल्या पक्षाचे ४० आमदार निघून जातात आणि सत्ताधाऱ्यांना पत्ता नाही. एकनाथ शिंदेंना पश्न विचारतात झालं काय. मग ते लगेच सांगतात. ते म्हणतात अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. अचानक नंतर अजित पवार मांडीवरच बसले. आता काय कराल. अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले होते. त्याच्या १० दिवसाआधी पंतप्रधान म्हणाले होते ७० हजार कोटींचा घोटाळा केलेल्या लोकांना आम्ही जेलमध्ये टाकू.’
‘मी जेवढा कडवट हिंदुत्ववादी आहे तेवढाच कडवट मराठी आहे. बंगाली भाषिक लोकांना विचारा. ते घरी आल्यावर ते काय करतात तर ते सांगतात आम्ही रविंद्रनाथ टागोर यांचं संगीत ऐकतो. सिंगापूरमध्ये एक बाई रेडिओवर तमिळ गाणं ऐकत होती. आपल्याकडे किती लोकं आहेत जे मराठी गाणी ऐकतो. याबाबतीत आपण कडवट असलं पाहिजे. महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो इतर कोणत्याही राज्याला नाही. मराठी बोलायला आम्हाला लाज वाटते.’
‘प्रत्येक राज्याचा माणूस आपआपल्या गोष्टींना जपतो. महाराष्ट्राच्या लोकांनाच का लाज वाटते. लोकांना त्रास देणारे कोणता धर्म असू शकत नाही. आमच्याकडे मंदिरात जायला वेळ नसतो. बाहेरूनच दर्शन घेतात. उद्धव ठाकरेंच्या सरकारने माझ्या १७ हजार मुलांवर केसेस टाकल्या. वर्षा गायकवाड या राहुल गांधींना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. पण त्यांनी त्याकडे पाहिलं देखील नाही. त्यांना तुम्ही निवडून देणार. सावकरांना शिव्या देणाऱ्या लोकांना तुम्ही निवडून देणार. माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस झाली तर दुकान बंद करुन टाकेल असं बाळासाहेब म्हणाले होते. तुम्ही शांत राहता म्हणून हे सगळं राजकारण होतं. ही सोपी निवडणूक नाहीये. एकदा राज ठाकरेच्या हातात सत्ता देऊन बघा.’