‘त्या’ पोस्टमधून समीर वानखेडे यांचं चोख प्रत्युत्तर, शाहरूखवर साधला निशाणा ? ‘जवान’मधील डायलॉगनंतर आले होते चर्चेत…
अभिनेता शाहरुख खान याच्या 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर काल रिलीज झाला. त्यातील एका डायलॉगद्वारे समीर वानखेडेंना टोला लगावण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनीही एक पोस्ट शेअर केली असून त्याद्वारे त्यांनी शाहरुखला चोख प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) बहुचर्चित ‘जवान‘ (Jawan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ॲक्शन, ड्रामा, थ्रिल या सर्व गोष्टींचा भरणा या ट्रेलरमध्ये दिसत असून तो बॉक्स ऑफीसवर सुपरहिट होईल याची चाहत्यांना गॅरेंटी आहे. मात्र याच चित्रपटाच्या ट्रेलमधील एका डायलॉगने लोकांचं लक्ष वेधलं. “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर ” हा शाहरूखचा डायलॉग असून नेटकऱ्यांनी या डायलॉगचे कनेक्शन एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याशी जोडला. त्यावरून काल सोशल मीडियावर दिवसभर चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर खुद्द समीर वानखेडे यांनी X (आधीचे ट्विटर) यावर एक पोस्ट शेअर केली असून त्या मार्फत त्यांनी शाहरूख खान याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.
समीर वानखेडे यांनी निकोल लायन्स यांचा एक कोट शेअर केला आहे. ‘मला तुझी तसूभरही भीती वाटत नाही’ असा या पोस्टचा अन्वयार्थ असून आता ही पोस्ट शाहरूखच्या डायलॉगला प्रत्युत्तर म्हणून लिहीण्यात आली आहे का, असा तर्क लढवला जात आहे.
I have licked the fire and danced in the ashes of every bridge I ever burned. I fear no hell from you. -Nicole Lyons A quote that always inspires me !@ABPNews @news24tvchannel @RoflGandhi_
— Sameer Wankhede (@swankhede_IRS) August 31, 2023
जवानच्या ट्रेलरवरून नेटकऱ्यांना पडला प्रश्न …
‘जवान’ हा चित्रपट येत्या 7 (सप्टेंबर) तारखेला रिलीज होणार असून काल (31 ऑगस्ट) त्याचा ट्रेलर रिलीज झाला. त्या ट्रेलरच्या अखेरीस शाहरूखचा एक डायलॉग आहे, ज्यामध्ये तो म्हणतो, “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.” त्याचा हा डायलॉग कालपासून सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला असून याद्वारे शाहरूखने समीर वानखेडे यांना टोला लगावला, असं नेटकरी म्हणत होते. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती.
काय होता वाद ?
2021 मध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी झाली, असा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. या छाप्यात अनेकांना अटक केली. त्यामध्ये अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश होतो. त्याचवेळी समीर वानखेडे हे मुंबई एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक होते. याप्रकरणी आर्यन खान हा जवळपास महिनाभर तुरुंगात होता. त्यानंतर जामिनावर त्याची सुटका झाली.
मात्र त्यानंतर काही काळाने समीर वानखेडे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाला. आर्यन खानच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी आर्यनच्या कुटुंबियांकडून 25 कोटी रुपयांची लाच मागितली, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.