कांदा शेतकरी हवालदिल, पण, मंत्री म्हणतात, परवडत नसेल तर…
शरद पवार यांच्यासारखे नेते देशाचे कृषिमंत्री होते. सत्ताधारी आणि विरोधक असा हा काही विषय नाही. त्यांनी कांदा प्रश्नावरून सरकारला काही सूचना केल्या असतील तर त्याचे स्वागत आहे.
नाशिक : 21 ऑगस्ट 2023 | एकीकडे राज्यात कांद्याचा दर वाढल्याने शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. स्वाभिमानी संघटनेसह विरोधकांनी राज्यसरकारला धारेवर धरले आहे. कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, राज्याच्या एका मंत्र्यांनी याच कांद्यावरून एक धक्कादायक विधान केलंय. कांद्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. ज्यांनी कांदा खरेदी केला आणि निर्यात करणारे व्यापारी यांच्यामध्येही थोडी भीती आहे. या भावना केंद्र सरकारच्या कानावर घातल्या जातील. निश्चितच सकारात्मक मार्ग निघेल असेही हे मंत्री म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कृषी खात्याचा पदभार असणारे आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी हे धक्कादायक विधान केलंय. नाशिक येथे ते बोलत होते. कांदा दर पडणार नाही याची काळजी सरकारच्यावतीने घेतली जाईल. काही वेळा कांद्याला २०० ते ३०० भाव मिळतात. काही वेळा २ हजारपर्यंत भाव जातात. यामुळे उत्पादन आणि पुरवठा यावर नियोजन करावे लागतं. नाशिक जिल्ह्यात हा संवेदनशील विषय आहे. यावर चर्चा करून मार्ग काढला जाईल. सर्व व्यवहार सुरळीत होतील, असं नियोजन केलं जाईल असे ते म्हणाले.
राज्यात निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण, जनतेमध्ये आल्यानंतर मतदार राजा काय असतो हे कळेल. एसी केबिनमध्ये बसून प्रश्न कळत नाही असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला. तसेच, नाशिक महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी अनेक उपाय राबवले गेले आहेत. त्यावर कुणाचे काही मार्गदर्शन आले तर त्याचीदेखील अंमलबजावणी केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांच्यासारखे नेते देशाचे कृषिमंत्री होते. सत्ताधारी आणि विरोधक असा हा काही विषय नाही. त्यांनी कांदा प्रश्नावरून सरकारला काही सूचना केल्या असतील तर त्याचे स्वागत आहे. चांगल्या गोष्टीसाठी पवार साहेबच काय, कुणीही समोर आले आणि त्याचं मार्गदर्शन चांगलं असेल तर स्वागतच असेल, असेही ते म्हणाले.
नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करता विचार विनिमय करून हा निर्णय व्हायला हवा होता ही वस्तुस्थिती आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला तर काही प्रोब्लेम नाही. ज्यावेळी आपण १ लाखांची गाडी वापरतो त्यावेळी १० रुपये जास्त देऊन २० रुपये देऊन माल खरेदी करावा. ५० पन्नास रुपये जास्त देऊन कांदा खरेदी केल्यास काही फरक पडणार नाही. ज्याला कांदा परवडत नाही त्याने दोन, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते? असे धक्कादायक विधान मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी केले.