मरावाड्यात कोरोनाता वाढता धोका, औरंगाबाद आणि परभणीत प्रशासनाकडून महत्वाचे निर्णय
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि परभणी जिल्हा प्रशासनानं महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
औरंगाबाद : विदर्भासह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा धोका वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद आणि परभणी जिल्हा प्रशासनानं महत्वाचे निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद शहरातील 10 वी आणि 12वीचे वर्ग वगळता सर्व वर्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ आता परभणी जिल्ह्यातही 10 वी आणि 12वीचे वर्ग सोडून अन्य वर्गाच्या शाळा 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा आदेश परभरणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. 10 वी आणि 12वी व्यतिरिक्त इतर सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करावा, असंही या आदेशात नमुद करण्यात आलं आहे.(Important decisions of Aurangabad and Parbhani administration)
परभणी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसंच काही शाळांमध्ये शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील 9वी आणि 11वीचे वर्ग तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. दुसरीकडे औरंगाबादेतील शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. कोरोनाचा चढता आलेख लक्षात घेता येथील प्रशासन सतर्क झाले आहे. औरंगाबाद माहनगरपालिका आयुक्त आस्तिककुमार पांडे यांनी शहरातील सर्व शाळा पुन्हा बंद करण्याचा आदेश दिला आहे.
औरंगाबादेत मास्क नसेल तर सीटीबसमध्ये नो एन्ट्री
औरंगाबादेतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क असेल तरच सीटी बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मास्क नसेल तर सीटी बसमध्ये नो एन्ट्री करण्यात आली आहे. इतकच नाही तर मास्क नसलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसा निर्णय औरंगाबाद महापालिकेनं घेतला आहे.
कोचिंग क्लासेसवर कारवाई
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं आता कोचिंग क्लासेसवर कारवाईचा धडाका सुरु करण्यात आलाय. महापालिकेकडून 6 कोचिंग क्लासेस चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कोचिंग क्लासेसकडून 26 हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पर्यटनाला मोठा फटका
कोरोनामुळे औरंगाबादच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. गेल्या 8 महिन्यात औरंगाबादेत फक्त 31 परदेशी पर्यटक आले आहे. विदेशी पर्यटकांचा फेब्रुवारी महिन्यात पुन्हा वेग मंदावला आहे. विदेशी पर्यटकांची संख्या घटल्यामुळे पर्टनावर आधारित उद्योगांना मोठा फटका बसलाय. दरवर्षी हजारो पर्यटक औरंगाबादला भेट देत असतात. पण कोरोनामुळे ही संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय
कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय
मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक केव्हाही, बी अॅलर्ट, कामाला लागा; विभागीय आयुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल
Important decisions of Aurangabad and Parbhani administration