बदलापुरात लोकल ट्रेनचे दरवाजे आतून बंद केले, संतप्त प्रवाशांचा गोंधळ, सुरु झाली चौकशी
बदलापूर रेल्वे स्थानकात कारशेडमधून आधीच बसून आलेल्या प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्याने प्रवाशांना लोकलमध्ये शिरायला वावच मिळाला नसल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रवाशांनी या प्रकरणी चांगलाच गोंधळ घातल्याचे व्हिडीओत दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
मुंबई | 13 डिसेंबर 2023 : मध्य रेल्वेचा रोजचा धकाधकीचा प्रवास प्रचंड त्रासदायक ठरला असताना रोज नवेनवे प्रकार घडत आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकात काल सकाळी 7.45 वाजता ऐनगर्दीच्या वेळी वांगणी आणि शेलू येथून बसून आलेल्या प्रवाशांनी लोकलच्या महिला डब्याचे दरवाजे आतून बंद केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे लोकलमध्ये चढायला न मिळालेल्या संतप्त प्रवाशांनी स्थानकात गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरु करुन चौकशी सुरु केली आहे.
मध्य रेल्वेतील बदलापूर स्थानकात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकल ट्रेनमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने कारशेडमध्ये लोकल उभी असताना त्यात प्रवासी आधीच चढून येत असतात. कर्जत ते सीएसएमटी लोकलमध्ये वांगणी आणि शेलू येथून बसून आलेल्या प्रवाशांनी लोकल बदलापूर स्थानकात आली असता उत्तर दिशेकडील महिला डब्याचे दरवाजे आतून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे बदलापूर स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांना लोकलमध्येच शिरायला न मिळाल्याने प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. या प्रकरणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य रेल्वेने या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणात चार ते पाच अज्ञात प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीन महिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलाविले असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.
होमगार्डवर कारवाई
लोकल ट्रेनमध्ये एक वर्दीतील होमगार्ड एका तरुणीसोबत नृत्य करीत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला होता. या प्रकरणात जीआरपी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ही घटना सहा डिसेंबर रोजी रात्री 10.10 ते 10.15 वाजताच्या मध्य रेल्वेच्या दरम्यान घडली आहे. हा होमगार्डचा जवान महिलांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्ताला होता. एक अभिनेत्री आणि गायिका तिच्या मुलीसह लोकलमधून प्रवास करीत होती. चिंचपोकळी आणि स्टॅंडहर्स्ट रोड दरम्यान या अभिनेत्री-गायिकेने तिची मुलगी नृत्य करीत असताना आपल्या मोबाईलने हा व्हिडीओ शूट केल्याचे म्हटले जात आहे.