Supriya Sule : ‘इतकं लाजरं कुणी…, शिक्षकांनी ऐकलं तर…’, सुप्रिया सुळे यांनी सांगितली ती आठवण…
लहान असताना माझ्याइतकं लाजरं कोणी नव्हतं. आमच्या घरी लोक यायचे तेव्हा मी आईच्या पदराला धरुन लपायचे. कुणाला भेटायला जावं लागलं तर दडपण यायचं. आज आईला माझा पदर धरावा लागतो आणि मला थांब म्हणावं लागतं.
बारामती : 7 ऑक्टोबर 2023 | जुन्या काळात महिला पोलिस नव्हत्या आणि पुरुषांना हाफ पँट असायची. पवार साहेब गृहमंत्री झाले आणि त्यांनी पोलिसांची फुल पँट केली. राज्यात हवाहवासा वाटणारा असे एकच गृहमंत्री झाले. ते म्हणजे आर आर आबा पाटील. आजही लोकांना त्यांच्याबद्दल प्रेम आहे. या राज्यात ज्याची आई खुरपायला जात होता त्यांचा मुलगा उपमुख्यमंत्री झाला असे सांगताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भावूक झाल्या. पोलिसांचं काम प्रचंड तणावाचं आहे. प्रचंड संघर्ष आहे. मुलींचे तर हाल होतात. मी खासदार का झाले याची माझ्या मनात स्पष्टता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पोलिस खात्यात का जाताय याचाही विचार केला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
लोकांनी आदर केला पाहिजे
बारामती येथील सह्याद्री करिअर अकादमी येथे मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. आर. आर. आबांनी महाराष्ट्रात डान्स बार बंद केले. आबांनी असंख्य निर्णय घेतले. त्यामुळेच देशात सर्वात जास्त कोणतं पोलीस दल असेल तर ते महाराष्ट्राचं. प्रत्येकाला पोलीस व्हायचंय याचं कौतुक आहे. पोलिस म्हणून काम करताना निष्ठेने करावं. पोलिस म्हणून तत्परता दाखवली पाहिजे. फक्त दम नाही द्यायचा. आम्ही कर भरतो म्हणून पगार होतो. लोकांनी तुमचा आदर केला पाहिजे. त्यांना भिती वाटू नये, असे त्या म्हणाल्या.
राज्य आणि देशाशी निष्ठेने रहा
आमच्या घरावर हल्ला झाला होता. त्यावेळी पोलिस धावत पळत आले. त्यांनी कष्टाने त्या लोकांना थांबवलं. ते लोक घरात घुसले असते तर माझ्या आई वडिलांचं काय झालं असतं याचा विचारही न केलेला बरा. प्रत्येकाला सुरक्षित वाटलं पाहिजे आणि वाईट करणाराला धडकी भरली पाहिजे असा वर्दीचा धाक असला पाहिजे. तुम्हीही पोलिस म्हणून काम करणार आहात तर महिला-पुरुष असं मनात आणू नका. पोलिसांना कुटुंबासमवेत सण, उत्सव साजरे करता येत नाही. ते आपल्या सुरक्षेसाठी तैनात असतात. पोलिस होणं सोपं काम नसतं. जे काही कराल ते प्रामाणिकपणे करा. वर्दी घातल्यानंतर राज्य आणि देशाशी निष्ठेने रहा, असे त्यांनी सांगितले.
आईबरोबर गद्दारी नाही
माझी खासदारकी ही माझी आई आहे. मी आईबरोबर गद्दारी करणार नाही. तसंच पोलिसांनीही वागावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पोलिस होणार आहात त्यामुळे मोबाईलवर जरा रील कमी बघा. इकडे तिकडे हात करतानाही शूट करतात. मनात येतील त्या बातम्या करतात. दर तीन तासाने मी फोन बघते आणि फक्त ५ मिनिटे रील बघते.
शाळेत एवढा अभ्यास केला असता तर…
सुत्रसंचालक म्हणाले, ‘सुप्रिया सुळे खूप अभ्यासू आहेत. पण, हे जर माझ्या शिक्षकांनी ऐकलं तर काय म्हणतील? अभ्यासू म्हटल्यावर मला आश्चर्य वाटतं. मी शाळेत एवढा अभ्यास केला असता तर मी एखाद्या कंपनीत अधिकारी झाले असते किंवा एखाद्या शाळेत शिक्षक. हा आत्मविश्वास वाचनातून आला. रोज एक तास व्यायाम करते. व्यायामाशिवाय उर्जा येत नाही. वेळ मिळेल तेव्हा चालते. म्हणून दिवसभर काम केल्यानंतर कधीही थकत नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.