‘खोका कोणी नेला? आता सापडत नाही, सरकारला येडं करून टाकू…’, भर सभेत मंत्री असं काय बोलून गेले?
आमच्यावर खोके, खोके म्हणून खूप टीका झाली. मात्र, राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत आले आणि खोके गायब झाले. मात्र, कोणता खोका कोणी नेला ते अजून सापडत नाही असा टोला शिंदे गटाचे मंत्री यांनी लगावला.
जळगाव : 17 सप्टेंबर 2023 | गुवाहाटीला गेलो म्हणून इतके बदनाम झालो की बाहेर पडले तर लोक खोके घेतले म्हणून बोलतात. जिकडे जिकडे गेलो तिकडे खोके घेऊन आला. खोके घेऊन आलास असे म्हणतात. आमची बदनामी करतात. मात्र, मला अशा बदनामीची फिकर नाही. ‘गुहाटी नही जाते तो हमे दिव्यांग मंत्रालय नही मिलता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वर्ष राहिलो. मात्र, दिव्यांग मंत्रालय झालं नाही. एकनाथ शिंदे यांना अट घातली. जर तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच तुमच्यासोबत येतो नाही तर गाडीतून खाली उतरतो, असे सांगत खोके, खोके म्हणून टीका करणाऱ्यांना आमदार बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र, याच कार्यक्रमात राज्यसरकारमधील एका मंत्र्याने शेरो शायरी करण्याच्या नादात ‘सरकारला येडं करून टाकू’, असं विधान केलंय.
जळगावमध्ये दिव्यांग विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घटनाक्रम सांगितला. दुसऱ्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी पुन्हा एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालयाबाबत आठवण करून दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा शब्द पाळला. त्यामुळेच आज दिव्यांग मंत्रालय मिळाले असे त्यांनी सांगितलं. याच कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी झाले होते.
राष्ट्रवादीवाले सोबत आले, खोके गायब झाले…
आमच्यावर खोके, खोके म्हणून खूप टीका झाली. मात्र, राष्ट्रवादीवाले आमच्यासोबत आले आणि खोके गायब झाले. मात्र, कोणता खोका कोणी नेला ते अजून सापडत नाही असा टोला शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी लगावला.
सरकारला पण येड करून टाकू…
राज्यात दिव्यांग बांधव पाच टक्के आहेत म्हणजेच 15000 दिव्यांग बांधव आहेत. ‘ये गिराने की ताकद रखते है और चूनके लाने की भी ताकद रखते है’, अशी डायलॉगबाजी त्यांनी केली. आम्ही जर दहा पंधरा एकसारखे सरकारला लटकलो तर सरकारला पण येड करून टाकू. पण, त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. अशी त्यांनी जुनी आठवण सांगितली. बदनामी करणारे करत राहतात. आम्ही आमचे काम करत राहतो असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.