Nagpur Crime | नागपुरात सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला, डोळ्यात मिरचीपूड टाकून दोन किलो सोने लुटले
नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली. व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. व्यापाऱ्याची गाडी व बॅगमधील सोने घेऊन आरोपी पसार झाले. या घटनेने सराफा व्यापाऱ्यांत दहशत पसरली आहे.
नागपूर : नागपुरात सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला करण्यात आला. व्यापाऱ्याकडून दोन किलो सोने लुटण्यात आले. शिवाय व्यापाऱ्याची दुचाकी सुद्धा चोरून नेली. नागपूरच्या पाचपावली (Pachpavli) पुलावर ही घटना घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पुलावर दुचाकीला ओव्हरटेक करत आरोपींनी मिरचीपूड (chili powder) फेकली. व्यापारी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कारण त्याच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. व्यापारी शुद्धीवर आल्यानंतर नेमकं सोनं ( gold) किती होत याचा खुलासा होणार आहे.
अशी घडली घटना
इतवारीतील सराफा व्यापारी केतन कामदार (वय 46) शनिवारी दुपारी कमाल चौकातील ज्वेलर्सला सोन्याचे दागिने दाखवायला गेले होते. पाचपावली पुलावरून परत येत असताना एका बाईकवरील तीन आरोपींनी त्यांना ओव्हरटेक केले. केतन यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. झटापटीनंतर आरोपींनी त्यांना खाली पाडले. चाकूने वार करून जखमी केले. सोन्याने भरलेली बॅग आणि बाईक घेऊन पसार झाले. जखमी केतन यांना एका व्यक्तीने गणेशपेठ येथील त्यांच्या घरी नेऊन सोडले. सीताबर्डी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रक्तबंबाळ झाल्याने केतन बेशुद्ध पडले होते. केतन यांच्याजवळ दोन ते तीन किलो सोने असल्याची माहिती आहे. या सोन्याची किंमत जवळपास दीड कोटी रुपये असेल.
काही आरोपी ताब्यात
भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळं पोलीस आयुक्त अमितेशकुमार, क्राईम ब्राँचचे अप्पर आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त चिन्मय पंडित, झोन तीनचे गजानन राजमाने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही आरोपींना ताब्यात घेतले. दोन दिवसांपूर्वीच व्यापारी संघटनेने सराफा लाईन परिसरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी इतवारी ठाण्यात केली होती.