आर. आर आबांचा मुलगा ‘या’ खासदारांवर भडकला, म्हणाला ‘तर मी निवडणुकीला…’
लोक काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहतात. माझं भविष्य अंधारात टाकायचे की नाही हे लोक ठरवतील. ते निश्चितपणाने माझं भविष्य ठरवतील. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मतदार संघांमध्ये फिरतोय. निवडणुका आल्यावर कुणी फिरायला चालू केलंय हे माहिती आहे.
शंकर देवकुळे, तासगाव : 1 ऑक्टोंबर 2023 | सांगलीमध्ये माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते दिवंगत आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील आणि भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्यातील राजकीय वाद उफाळून आला आहे. खासदार संजयकाका पाटील यांनी तासगावच्या आमदार सुमनताई पाटील या पुत्र प्रेमासाठी, मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी राजकीय नौटंकी करत असल्याची टीका केलीय. त्याला रोहीत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातील प्रत्येकी नऊ गावातील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी मिळावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई आर आर पाटील यांनी केलीय. या मागणीसाठी आमदार सुमनताई यांनी 2 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. मुलगा आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह हे आंदोलन करणार असे सुमनताई पाटील यांनी जाहीर केलंय. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिलंय.
भाजप खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ज्या गावांच्या समाविष्टसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे त्यांचा टेंभू विस्तारित योजनेत समावेश झाला आहे. आमदार सुमन ताई पाटील आणि रोहित पाटील हे एक उपोषणाला बसण्याची नौटंकी करत आहेत अशी टीका त्यांनी केली.
त्यांनी प्रयत्न केले नाहीत म्हणून
खासदार संजयकाका पाटील यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते रोहित पाटील यांनी उत्तर दिलंय. पाण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न केले ते लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. त्यांनी जर प्रयत्न केले असते तर आम्हाला आमरण उपोषण करायची वेळ आली नसती. त्यांनी प्रयत्न केले नाहीत म्हणूनच हा निर्णय घ्यावा लागतोय असे ते म्हणाले.
निवडणुका आल्यावर कुणी फिरायला
आम्ही आमच्या हक्काच्या पाण्यासाठी उपोषणाला बसणार आहे. या मतदारसंघातल्या प्रत्येक घटकाच्या मागे उभे राहण्याचे काम गेले अनेक वर्ष करतोय. त्यामुळे इथल्या लोकांना कोण किती अंधारात आहे आणि निवडणुका आल्यावर कुणी फिरायला चालू केलंय हे माहिती आहे असा टोला त्यांनी लगावला.
तर घरी बसायची माझी तयारी
लोक काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहतात. माझं भविष्य अंधारात टाकायचे की नाही हे लोक ठरवतील. त्यामुळे तासगाव आणि कवठे महांकाळ तालुक्यातल्या विवेकबुद्धी असणाऱ्या सर्व लोकांवर माझा विश्वास आहे. ते निश्चितपणाने माझं भविष्य ठरवतील. त्यांनी जर घरी बसवलं तर घरी बसायची माझी तयारी आहे असे त्यांनी सांगितले.
प्रसिद्ध आहेत म्हणून निवडणुकीला
समाज माध्यमांवर आमची प्रसिद्धी वाढली म्हणून रोहित पाटील आणि सुमनताई हे नौटंकी करतात असं मी ऐकलं. खरं तर समाज माध्यमांवर अनेक प्रकारचे लोक प्रसिद्ध होत असतात. अलीकडच्या काळात अनेक कलाकार, नृत्यांगनात प्रसिद्ध झाल्या आहेत. याचा अर्थ त्या प्रसिद्ध आहेत म्हणून निवडणुकीला उभं राहायचं असं असतं का? असा खरमरीत टोला त्यांनी खासदार संजयकाका पाटील यांना लगावला.
निवडणुकीचा दृष्टिकोन माझ्या डोळ्यासमोर मी कधीच ठेवला नाही. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मतदार संघांमध्ये फिरतोय. आज घडीला माझं वय वर्ष 24 आहे. अचानक निवडणूक लागली तर कदाचित मी निवडणुकीला उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या भविष्याची चिंता करून जर मी राजकारण करत असतो तर ते केले नसते असेही रोहित पाटील यांनी स्पष्ट केले.