प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा, पुढच्या 3 दिवसांचे कार्यक्रम रद्द
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून इंदुरीकर महाराजांचे पुढचे तीन दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मनोज गाडेकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 25 जानेवारी 2024 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा भव्य मोर्चा आज लोणावळ्याला पोहोचला आहे. हा मोर्चा आज रात्री नवी मुंबईच्या वाशी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांचा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानाच्या दिशेला निघणार आहे. मनोज जरांगे यांनी आंदोलनासाठी मुंबईत येऊ नये, अशी विनंती सरकारकडून केली जात आहे. पण मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तसेच ते मुंबईला येण्यावर ठाम आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातील लाखो मराठा समाजाच्या नागरिकांकडून पाठिंबा दिला जात आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराजांनी पुढील 3 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. इंदुरीकर महाराज यांचे 26, 27 आणि 28 जानेवारीला होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इंदुरीकर महाराजांनी मागील आंदोलनाच्यावेळी देखील त्यांचे 5 दिवसांचे सर्व कार्यक्रम स्थगित केले होते. त्यानंतर आता उद्यापासून पुढील 3 दिवस सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. इंदुरीकर महाराजांचे सहाय्यक किरण महाराज शेटे यांनी याबाबत माहिती दिली.
सरकारचं शिष्टमंडळ नवा जीआर घेऊन जरांगेंच्या भेटीला रवाना
दरम्यान, मनोज जरांगे यांनी मुंबई येऊ नये, यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लोणावळ्याच्या दिशेला निघालं आहे. या शिष्टमंडळाकडे सरकारचा नवा जीआर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे आणि विधी-न्याय विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले आहेत. सरकारचं शिष्टमंडळ मराठा आरक्षणाबाबतचा नवा जीआर मनोज जरांगे यांना दाखवणार आहेत. या जीआरमध्ये मनोज जरांगे यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जीआरमध्ये मनोज जरांगे यांच्या सगेसोयरे मुद्द्यावर सविस्तर मांडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा जीआर वाचल्यानंतर मनोज जरांगे काय भूमिका घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.