दोन जिल्ह्यांतून दुष्काळ गायब होणार? शिवजलक्रांतीचा तिसरा टप्पा सुरू; जलसिंचनाच्या कामाला धडाक्यात सुरुवात
धाराशिव जिल्ह्यात शिवजल क्रांतीची 1 हजार 150 किमीची कामे पुर्ण झाल्यावर भुम परंडा या भागातील दुष्काळाची धग कमी होण्यास मदत होणार आहे.
संतोष जाधव, धाराशिव: यंदा नेहमीप्रमाणे रखरखीत उन्हाळा सुरु झालेला नाही तरीही दुष्काळ हा मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भाला कायमचाच पुजलेला आहे. त्यातही धाराशिव (Dharashiv) कायम रुक्ष असलेला जिल्हा. जिल्ह्याचं हे रुप पालटण्यासाठी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी सुरु केलेली शिवजलक्रांती योजना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या योजनेचा पहिला आणि दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झालाय. योजनेमुळे धाराशिवच नाही तर यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळ दूर होण्यास मदत होणार आहे. योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील जलसिंचन कामांना सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात या योजनेतून यावर्षी 500 किमीची नदी नाला सरळीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे या भागातील दुष्काळचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या हस्ते भुम तालुक्यातील देवांग्रा येथे कामाचा शुभारंभ करण्यात आला.
तिसऱ्या टप्प्यात 500 किमी जलसिंचनाची कामे
मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी भूम परंडा वाशी या त्यांच्या मतदार संघासह धाराशिव व यवतमाळ जिल्ह्यात स्व बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसिंचन व जलसंधारणाची कामे केली. सावंत प्रतिष्ठान व भैरवनाथ शुगर समुहाच्या माध्यमातून ही कामे होत आहेत. धाराशिव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 500 व दुसऱ्या टप्प्यात 150 किमी अशी 650 किमी खोलीकरण कामे यापूर्वी केली आहेत. चालु वर्षी 2023 मध्ये आणखी 500 किमीची कामे करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार कामांचा आराखडा गावनिहाय बनविला असून टप्याटप्याने ही कामे सुरु करण्यात आली आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे यांनी दिली.
बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती योजना
धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा हा भाग कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो, या भागात काही भागात वर्षातील 12 महिने पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असतो ही बाब लक्षात आल्यावर सावंत यांनी शिवजलक्रांती योजना मांडली. 2016 मध्ये नदी, नाला सरळीकरण, खोलीकरण व रुंदीकरण अशी जलसंधारणाची कामे हाती घेतली. भुम परंडा तालुक्यातील उल्का, विश्वरूपा, उल्फा, चांदणी, बाणगंगा, रामगंगा, नळी, खैरी, सीना या नदीच्या भागात कामे झाली त्यामुळे हरीतक्रांती होत शेतीचे सिंचन क्षेत्र वाढले त्याच बरोबर पाण्याची भुजल पातळी वाढली, असे घोगरे यांनी सांगितले. सावंत यांनी या योजनेला स्व बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती असे नाव दिले आहे. 650 किमीची कामे केल्याने त्यांना शिवजलक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाने नवसंजीवनी
शिवजलक्रांती योजनेमुळे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पास गती आली आहे. या प्रकल्पाच्या 11 हजार 347 कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्य मिळाली आहे. धाराशिव व बीड जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 133 गावातील 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. प्रकल्पाने नवसंजीवनी मिळाली असून दुष्काळमुक्तीकडे वाटचाल होणार आहे. जून 2025 पर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.