पैसे नसतानाही उपचारासाठी धडपड, रुग्णालयातूनच इंजेक्शनची चोरी, नातेवाईकांना अश्रू अनावर
धुळ्यात रुग्णाच्या नातेवाईकांनी आणून दिलेले इंजेक्शन थेट रुग्णालयातून चोरी झाल्याचे समोर आले आहे.
धुळे : राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेमुळे सगळे हैराण आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन तसेच इतर औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. औषधी वेळेवर मिळत नसल्यामुळे आधीच रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये अस्थिरतेचं वातावरण आहे. यानंतर आता धुळ्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी आणून दिलेले इंजेक्शन थेट रुग्णालयातून चोरी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर रुग्णालयांच्या अतंर्गत तसेच बाहेर इंजेक्शनची चोरी करणाऱ्या लोकांचं जाळं सक्रिय नाही ना ? असा प्रश्न विचारला जातोय. (injection of patient admitted for Mucormycosis has been stolen Dhule relatives demands investigation)
नेमका प्रकार काय ?
मुडावद येथील एका रुग्णाला म्युकर मायकोसिसवरील (Mucormycosis) उपचारासाठी धुळ्यातील जवाहर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून या रुग्णावर येथे उपचार सुरु आहेत. रुग्णावरील उपचारादरम्यान डॉक्टरांनी आंफोमूल नावाचे 6 इंजेक्शन आणण्यास सांगितले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार नातेवाईकांनी 6 इंजेक्शन आणून दिले. त्यापैकी डॉक्टरांनी 2 इंजेक्शन रुग्णाला दिले. उर्वरित 4 इंजेक्शन डॉक्टरांनी ठेवून दिले होते. याच काळात एका रात्रीतून हे चारही इंजेक्शन चोरीला गेले.
औषधालयातील बॉक्सवर रुग्णाचे नाव
हा प्रकार रुग्णांच्या नातेवाईकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी ज्या औषधालयामध्ये जाण्याचे सांगितले त्याच औषधालयात हे इंजेक्शन पुन्हा सापडले. विशेष म्हणजे या औषधालयातील एका बॉक्सवर ज्या रुग्णाचे इंजेक्शन गायब झाले होते, त्याच रुग्णाचे नाव होते. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली आहे. कोरोना काळात तसेच इतर आजारांवर उपचार वेळेवर मिळत नसताना धुळ्यात इंजेक्शन चोरी करणारी टोळी सक्रिय आहे का? असा सवाल विचारला जातोय.
नातेवाईकांच्या डोळ्यातं आश्रू
हा प्रकार समोर आल्यानंतर जवाहर मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, या प्रकाराबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोणतीही बाजू मांडण्यास टाळाटाळ केली. मात्र, जवळ पैसे नसूनसुद्धा रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. उपचार व्यवस्थित होतील ही आशा असताना ऐनवेळी ते चोरीला गेल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. सध्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून औषधालय, डॉक्टर, तसेच इंजेक्शन चोरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
इतर बातमी :
बारावी पास बोगस डॉक्टर, इंटरनेवरुन उपचार, प्रेमी युगुलांचे अवैध गर्भपात, पुस्तकं वाचून औषधं
कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO नं बनवलेलं औषध ऑक्सिजनची आवश्यकता कमी करणार
रोज किती मीठ खायचं?; जागतिक आरोग्य संघटनेकडून गाइडलाईन जारी !
(injection of patient admitted for Mucormycosis has been stolen Dhule relatives demands investigation)