मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्यावर तोफ डागली आहे. खरमाटे आणि सचिन वाझेंकडून (sachin waze) पैसे घेतले आणि रिसॉर्ट बांधला गेला. कोव्हिडच्या नावाखाली लॉकडाऊन केला आणि घोटाळा केला. त्यामुळे परबांनो, बॅग भरा, तयारी करा, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. त्यामुळे अनिल परब यांना अटक होणार का? या बाबतचे तर्क वितर्क लढवले जात आहेत. तसेच हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांचा आता नंबर लागणार असल्याचा दावाही सोमय्या यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परब आणि मुश्रीफ यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता बळावली आहे. या आधीच ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे. तर शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकलेल्या आहेत. त्यातच आता सोमय्या यांनी परब आणि मुश्रीफ यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा केल्याने आघाडी सरकारच्या अडचणी वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
माझा रिसॉर्टशी काहीच संबंध नाही असं अनिल परब गेल्या सहा महिन्यांपासून रोज बोलत आहेत. परबांनो, मोदी सरकारने याचिका दाखल केली आहे. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. ही केंद्र सरकारची याचिका आहे. कोर्टाने त्याची दखल घेतली आहे. येत्या 16 एप्रिल रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे परबांनो, बॅग भरा. तयारी करा, असा इशारा किरीट सोमय्या यांनी मीडियाशी बोलताना दिला.
हसन मुश्रीफ यांनी ज्या शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला आहे. घोटाळा केला आहे. त्याचा तपास करण्याचे आदेश कोर्टाकडून दिले जाणार आहेत. त्यांच्या कारनाम्यांवरील कारवाईला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यांनी घोटाळे केले, आम्ही त्याची तक्रार केंद्र सरकारकडे केली. केंद्राने तक्रारीची दखल घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे. एकूण 158 कोटींचा घोटाळा आहे. आता ईडी, कंपनी मंत्रालय आणि आयटी विभाग कारवाई करू शकतात, असं ते म्हणाले.
पवार कुटूंबियांना ग्लिसरीनचा सप्लाय यायचा म्हणून ते रडायचे. पुढच्या आठवड्यात जरंडेश्वर साखर कारखान्याचे 27 हजार शेतकरी मुंबईत येणार आहेत. हे शेतकरी ईडी कार्यालयात जाणार आहेत. अजित पवार, शरद पवार यांनी घरच्या महिलांचा घोटाळ्यासाठी वापर केला. पवार परिवार शेतकऱ्यांना लुटणारं कुटूंब आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
महावसुली आघाडीची लूट सुरू आहे. सतिश उके यांच्या अटकेमुळे घोटाळे बाहेर येणार आहेत. किती जमीन ढापली, किती मनी लॉन्ड्रिंग केली ते दाखवावे लागणार आहे, असं सांगतानाच मागच्या पाडव्याला यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा मी संकल्प सोडला. पुढच्या पाडव्यापर्यंत या सगळ्या डर्टी डझनवर कारवाई झालेली असेल, असा दावाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
सुजीत पाटकर यांनी किरीट सोमय्या यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला