शिंदे-फडणवीस यांच्यात बैठक, एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होण्यास सकारात्मक आहेत की नाही?
एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावेत यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. पण शिंदे खरंच सकारात्मक आहेत का? याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली सुरु आहेत. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस हे आज संध्याकाळी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद हवं आहे. त्यासाठी ते प्रचंड आग्रही आहेत. एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी इतके आग्रही आहेत की, देवेंद्र फडणवीस यांनी आज भर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात सहभागी राहावेत, अशी विनंती केल्याचे म्हणाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावेत यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. पण शिंदे खरंच सकारात्मक आहेत का? याबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
“एकनाथ शिंदे हे पूर्णपणे सकारात्मक आहेत. यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, त्या निर्णयासोबत आपण असल्याचं म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर ते आज स्वत: राजभवनावर अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकार स्थापनेच्या दावा करण्यासाठी गेले होते. त्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये आम्ही दोन वर्ष मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद न बघता कारभार ज्या पद्धतीने केला तसंच महाराष्ट्राच्या जनतेचं हित आम्हाला महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही तिघेही एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करु, असं पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीरपणे सांगितलं आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
शिंदे-फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा?
“आम्ही एकत्रित सरकार चालवण्यासाठी सकारात्मक आहोत, हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. उद्या महायुतीचं सरकार निश्चितपणे स्थापन होईल. आता शेवटी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जाणं एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणं, मग उद्याचा शपथविधी, मंत्रिमंडळ, खातेवाटप अशा अनेक चर्चा तीनही नेत्यांमध्ये होणार. त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वभाविकपणे त्या ठिकाणी गेले असतील”, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आजच्या पत्रकार परिषदेतच मंत्रिमंडळात सहभाही व्हा, अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रातील जनतेची आणि आमदारांची इच्छा आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे जनतेचा विचार करुन देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी होऊन महाराष्ट्राला दिशा आणि विकास देण्याचं काम करावं, अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती आमची आहे”, असं प्रवीण दरेकर म्हणाले.