सिंधुदुर्ग | 30 सप्टेंबर 2023 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते यावर काय स्पष्टीकरण देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. तर दुसरीकडे या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. खरंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणाऱ्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा 2018 मध्ये करण्यात आली होती. देशातील हा पहिला पाणबुडी प्रकल्प निवती रॉक्स जवळील समुद्रात येणार होता. पाण्याखालील अंतरंग न्याहाळण्याची या प्रकल्पात योजना होती. मात्र आता हा प्रकल्प गुजरात सरकारने हाती घेतला असून महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकल्पासाठी 56 कोटी निधी मंजूर झाला होता. मात्र राज्यकर्त्यांच्या अनास्थेमुळे सिंधुदुर्गच्या पाणबुडी प्रकल्पाला चालणा मिळाली नसल्याचे चित्र आहे. या पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना समुद्राच्या पाण्याखालील अद्भुत दुनिया जवळून पाहता येणार होती. या प्रकल्पामुळे स्थानिकांना सुद्धा रोजगार निर्मिती होणार होती. मात्र निधीची तरतूद केली असताना नेमक्या अडचणी कुठे आल्या? याचे राज्यकर्त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. आता हा प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचे सांगितले जात असून गुजरात सरकार आणि माझगाव डॉकयार्ड द्वारकेच्या समुद्रात असाच पाणबुडी प्रकल्प राबवित आहे. जानेवारीत व्हायब्रेट गुजरात समिटमध्ये याची अधिकृत घोषणा होणार आहे.
महाराष्ट्रातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना आजपर्यंत महाराष्ट्र इतका थंड कधीच दिसला नाही. हे अनाकलनीय आहे. विरोधकांनी आवाज उठवायचा, आंदोलनं करायची. पण सरकारने मात्र डोळ्यावर झापडं लावून आणि कानावर हात ठेवून काही घडलंच नाही, असं दाखवायचं, हे कुठवर सहन करायचं? महाराष्ट्रातून गुजरातला प्रकल्प गेल्याच्या बातम्या अजून किती दिवस फक्त वाचत बसायचं?”, असे सवाल रोहित पवार यांनी केले आहेत.
“मला विश्वास आहे, महाराष्ट्रातला युवा थंड बसणार नाही आणि या सरकारला जागा दाखवल्याशिवाय थांबणार नाही. कारण ही लढाई महाराष्ट्र धर्माची आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची अन् महाराष्ट्राच्या अस्मितेची”, असं रोहित पवार ट्विटरवर म्हणाले आहेत. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील या वृत्तावरुन सरकारला टोला लगावला आहे. “अख्खा महाराष्ट्र गुजरात ला घेऊन जा बाबांनौ. वाढू दे बेरोजगारी”, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी लगावला आहे.