भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल
Lok Sabha Election Maharashtra Politics raksha khadse girish mahajan: भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रक्षा खडसे फिरत आहेत. त्यांच्या गाडीत तुतारीची लोक असतात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २३ उमेदवार जाहीर केले आहेत. या ठिकाणी कुठेही बंडखोरी झाली नाही. परंतु नाराजीनाट्याचा प्रकार काही ठिकाणी सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील विद्यामान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारीवर भाजपमधील एक गट नाराज आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटातील आमदार एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. यामुळेच भाजपचा एक गट त्यांना विरोध करत आहेत. आता जळगावात भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर रक्षा खडसे व पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बैठकीत कार्यकर्त्यांनी विचारला जाब
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या बैठकीतील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एकनाथ खडसे यांचे नाव घेतात मात्र मंत्री गिरीश महाजन यांचे नाव का घेत नाही? असे पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना विचारले. तसेच रक्षा खडसे भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन फिरत आहेत. त्यांच्या गाडीत तुतारीची लोक असतात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर यासंदर्भात उघड नाराजी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
असा झाला वाद
नाराज पदाधिकाऱ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच रक्षा खडसे यांना खडेबोल सुनावले. व्हिडिओत कार्यकर्ते म्हणतात, आम्ही मतदान भाजपलाच करु. १०१ टक्के कमळ निवडून येणार आहे. परंतु कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. रक्षा खडसे भाजप कार्यकर्त्यांऐवजी सुधाकर जावळे यांना घेऊन बसतात…. आम्ही काय येथेXXXX…. भाऊ समोर जोरात बोलू नका….. शपथ घेऊन सांगा गाडीत भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीचे कार्यकर्ते…. तुम्ही एकनाथ खडसे यांचे नाव घेतात, पण गिरीश महाजन यांचे नाव घेत नाही?…. अशा आरोपांचा भडीमार भाजप कार्यकर्ते रक्षा खडसे यांच्यावर करताना व्हिडिओत दिसत आहेत. कार्यकर्ते आणि रक्षा खडसे यांच्यात खडजंगी सुरु असताना गिरीश महाजन कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
जळगावात भाजप बैठकीत वादळ, पदाधिकारी अन् उमेदवार रक्षा खडसे यांच्यात खडाजंगी#BJP #BJPList pic.twitter.com/YPEIZsse6A
— jitendra (@jitendrazavar) March 26, 2024
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह तसेच रक्षा खडसे यांच्या विरोधात पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी समोर आली आहे. बैठकीला आमदार, पदाधिकारी तसेच जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती असल्याचे व्हिडिओत दिसत आहेत.