जळगावच्या राजकारणात ट्विस्ट, अर्ज दाखल करण्याआधीच उमेदवाराकडून उमेदवारी मागे
गेल्या काही दिवसांपासून जळगाव लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघात विविध पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप, ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण अचानक एका उमेदवाराने आपली उमेदवारी मागे घेतल्याची माहिती समोर येत आहे.
किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : जळगाव लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वीच प्रफुल्ल लोढा यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जळगाव लोकसभेतून प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी जाहीर केली होती. मतदारसंघातली परिस्थिती लक्षात घेऊन आपला विजय होणार नाही. त्यामुळे उमेदवारी मागे घेत असल्याचा निर्णय घेतल्याचं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे.
उमेदवारी मागे घेत असल्याबद्दल प्रफुल्ल लोढा यांचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणं झालं आहे. प्रफुल्ल लोढा आगामी काळात कोणाच्या पाठीशी उभं राहायचं आणि कुणाच्या सोबत राहायचं याबद्दलची भूमिका स्पष्ट करणार आहेत. “कुणाचाही माझ्यावर दबाव नाही. कुणाच्या दबावाला मरेपर्यंत मी घाबरणारा नाही. स्वतःच्या मनाने उमेदवारी घेतली आणि स्वतःच्या मनाने उमेदवारी मागे घेतली”, असं प्रफुल्ल लोढा यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण असणार? याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
वंचितकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा धडाका सुरुच आहे. वंचितकडून उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सातारा आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आले आहेत. वंचितकडून साताऱ्यातून प्रशांत कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे वंचितकडून आणखी एक महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे. वंचितने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समनक जनता पक्षाचे (गोर सेना) उमेदवार अनिल राठोड यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचितचा फटका कुणला बसणार?
वंचित बहुजन आघाडी पक्ष हा राज्यातील ताकदवान पक्ष आहे. कारण 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आकडेवारी तरी हेच सांगते. गेल्या विधानसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनेक मतदारसंघामध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या क्रमांकाने लीडवर होते. तसेच तसेच लोकसभेतही अनेक दिग्गजांना फटका बसला होता. त्यामुळे वंचितकडे दुर्लक्ष करणं हे महाविकास आघाडीसाठी आगामी काळात जास्त घातक ठरण्याची शक्यता आहे. वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचे देखील प्रयत्न झाले. पण जागावाटपावरुन एकमत न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलोचा नारा दिला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारंचा फटका कुणाला बसणार? हे पाहणं आगामी काळात जास्त महत्त्वाचं असणार आहे.