गिरीश महाजन यांच्या कार्यालयाला संतप्त आंदोलकांनी ठोकलं कुलूप, नेमकं काय घडलं?
जळगावात आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप ठोकलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गिरीश महाजन या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 24 जानेवारी 2024 : जळगावात आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांनी आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप ठोकलं आहे. आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांचं जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी 21 दिवसांपासून आमरण अन्नत्याग उपोषण सुरु आहे. गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या उपोषणस्थळी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट न दिल्याने आदिवासी कोळी आंदोलक संतापले. त्यामुळे आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाला टाळं ठोकलं. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जळगावच्या तीनही मंत्र्यांना गावबंदी करण्यासह मंत्र्यांना काळं फासून त्यांच्या गाड्या फोडण्यात येतील, असा इशारा दिला.
आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांचं जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या 21 दिवसांपासून आमरण अन्नत्याग उपोषण सुरू आहे. उपोषण स्थळापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर मंत्री गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. मात्र उपोषणस्थळी उपोषणकर्त्यांची भेट घेतली नाही, त्यामुळे आक्रमक झालेल्या तसेच संतप्त आदिवासी कोळी समाज बांधवांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप ठोकून निषेध व्यक्त केला.
आंदोलकांचा जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना मोठा इशारा
21 दिवस उलटूनही जळगाव जिल्ह्यातल्या तीनही मंत्र्यांचे तसेच जिल्हा प्रशासनाचे आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्याने आदिवासी कोळी समाज बांधवांनी आज मंत्र्यांच्या तसेच प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन केले. जळगावतील तीनही मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्यांने आंदोलनस्थळी भेट दिली नाही. तसेच आदिवासी कोळी समाजाच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने आक्रमक झालेल्या आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलकांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयाला कुलूप ठोकलं.
आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर कुठल्याच गावात मंत्र्यांना प्रवेश करू दिला जाणार नाही. तसेच ज्या ठिकाणी मंत्री दिसतील त्या ठिकाणी त्यांना काळं फासण्यात येईल. त्यांच्या गाड्या फोडण्यात येईल, असा आक्रमक इशाराच कोळी समाजाच्या आंदोलकांनी आता दिला आहे.