लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट केला? पाहा अजित पवार यांच्यासमोर नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमळनेरमध्ये थेट शेताच्या बांधावर पोहोचले. यावेळी अजित पवार यांनी शेतात काम करणाऱ्या महिलांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला का? असा प्रश्न विचारतात. यावेळी एक महिला आपला फॉर्म रिजेक्ट केल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे करते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. हा मतदारसंघ राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा मतदारसंघ आहे. अजित पवार या दौऱ्यादरम्यान अमळनेरमध्ये थेट शेताच्या बांधावर पोहोचले. तिथे त्यांनी शेतात काम करणाऱ्या महिलेशी संवाद साधला. अजित पवार यांनी महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचं तसेच त्या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. यावेळी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अजित पवारांनी शेतातील महिलांसोबत संवाद साधला. विशेष म्हणजे यावेळी काही महिलांनी आपला अर्ज स्वीकारला गेला नसल्याची तक्रार अजित पवारांकडे करतात. त्यानंतर अजित पवार तातडीने मंत्री अनिल पाटील यांना आपला पीए महिलांकडे पाठवून त्यांचा अर्ज स्वीकारला जावा यासाठी बंदोबस्त करण्याची सूचना करतात.
अजित पवार यांनी यावेळी महिलांना विचारलं की, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरला का? त्यावर काही महिलांनी अर्ज भरला आहे. पण स्वीकारला नाही, असं म्हटलं. यापैकी एका महिलेने आपली कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे आपण कालच फॉर्म भरला असल्याचं अजित पवारांना सांगते. यावेळी महिला अजित पवार यांना आपला मुलगा एमए आणि बीएड झाला आहे तरी तो शेतातच राबत असल्याची खंत व्यक्त करते. यावेळी अजित संबंधित तरुणाला कोणत्या महाविद्यालयातून शिक्षण घेतलं, किती टक्के मिळाले? अशी विचारपूस करतात. तसेच भरतीसाठी प्रयत्न केला का? असा प्रश्न अजित पवार विचारतात. यावेळी तरुणाची आई आपला मुलगा प्रत्येक भरतीसाठी प्रयत्न करत असल्याचं सांगते.
अजित पवार यावेळी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करतात. आम्ही तुमच्यासाठी एक योजना सुरु केली आहे. त्या योजनेचा तुम्ही सर्वांनी लाभ घ्या, असं अजित पवार आवाहन करतात. तसेच ते मंत्री अनिल पाटील यांनाही महत्त्वाची सूचना करतात. आमदार साहेब, तुमचा पीए या महिलांकडे पाठवा. त्यांचे फॉर्म का सबमिट झाले नाहीत याची चौकशी करा. आपण बघितलं पाहिजे ना, यंत्रणा सोडली पाहिजे ना, अशी सूचना अजित पवार अनिल पाटील यांना करतात.
लाडकी बहीण योजना कुणी सुरु केली? अजित पवारांचा प्रश्न
यावेळी आणखी एक मजेशीर किस्सा बघायला मिळाला. अजित पवार महिलांना एक प्रश्न विचारतात. लाडकी बहीण योजना कुणी आणली? असा प्रश्न अजित पवार महिलांना विचारतात. त्यावर महिला तुम्हीच आणली असं उत्तर देते. पण यावर अजित पवार म्हणतात पण नेमकं कुणी आणली? त्यावर महिला अजित दादा पवार असं उत्तर देते. तर तुसरी महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेते.
अजित पवार यांची शाळकरी मुलीशी संवाद
यावेळी अजित पवार एका शाळकरी मुलीशी देखील संवाद साधतात. या मुलीला अजित पवार कोणत्या इयत्तेत शिक्षण घेत आहे? असं विचारतात. तसेच तुला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण घे, तुला सर्व शिक्षण मोफत आहे, असं अजित पवार या मुलीला सांगतात. तुला आयएएस व्हायचं असेल, आयपीएस व्हायचं असेल, जे व्हायचं असेल त्यासाठी तुला मोफत शिक्षण मिळेल, असं अजित पवार या शाळकरी मुलीला सांगतात. तसेच ते महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करतात.