‘अमित शाह, नड्डा यांनी खडसेंना पक्षप्रवेश दिला तर आमची मजाल आहे का नाही म्हणण्याची?’, गिरीश महाजन यांचं वक्तव्य
"एकनाथ खडसे यांनी जर म्हटलं आहे की वरिष्ठांनी प्रवेश दिलेला आहे तर वरिष्ठ त्याबद्दल निर्णय घेतील. आम्ही का वरिष्ठांच्या पेक्षा वरिष्ठ आहोत का? अमित शाह असतील किंवा आमचे अध्यक्ष जे. पी. नड्डा असतील, त्यांनी जर म्हटलं की इनको लेलिया तर आमची मजाल आहे का नाही म्हणण्याची?", अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाबाबत आज पुन्हा भाष्य केलं आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या भाजप प्रवेशास महाराष्ट्र भाजपमधील दोन नेते विरोध करत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे खडसेंनी त्या दोन नेत्यांची नावे देखील घेतली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशास विरोध आहे, असं खुद्द खडसेंनी स्पष्ट केलं आहे. यानंतर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ खडसे यांचं मला समजत नाही, ते कधी सांगतात अमित शाहा यांच्या हस्ते प्रवेश झाला. कधी सांगतात जे. पी. नड्डा यांच्या हस्ते प्रवेश झाला. वरिष्ठांनी जर त्यांच्या प्रवेश केलेला आहे तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण आहोत? उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं”, असं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी दिलं.
“सून आली की मी बीजेपीचे काम करतो. आता पोरगी आली तर मी राष्ट्रवादीचे काम करतो. भाजपमध्ये आहेत का राष्ट्रवादीमध्ये आहेत? हे मला कळत नाही, असंच ते म्हणत आहेत. तुम्ही जर म्हणतात की, मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग शरद पवार तुम्हाला राजीनामा का मागत नाहीत? पण हे सगळे मिलीजुली चाललेल आहे. सोयीनुसार चाललेलं आहे”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
‘आपल्याच घरामध्ये सगळे पदं पाहिजेत’
“भाजपला जर मदत केली असेल तर त्यानंतरही शरद पवार यांचा राजीनामा घेत नसतील तर एवढे प्रेम का?”, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला. “याही दगडावर पाय ठेवायचा आणि त्याही दगडावर पाय ठेवायचा, अशी भूमिका का? असं दुहेरी राजकारण नाही करता येणार किंवा चालणार नाही. आपल्याच घरामध्ये सगळे पदं पाहिजेत, वेगवेगळ्या पक्षाचे पाहिजे, हा कुठला प्रकार?”, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.
“त्यांनी जर म्हटलं आहे की वरिष्ठांनी प्रवेश दिलेला आहे तर वरिष्ठ त्याबद्दल निर्णय घेतील. आम्ही का वरिष्ठांच्या पेक्षा वरिष्ठ आहोत का? अमित शाह असतील किंवा आमचे अध्यक्ष जे. पी. नड्डा असतील, त्यांनी जर म्हटलं की इनको लेलिया तर आमची मजाल आहे का नाही म्हणण्याची?”, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.