‘एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही, मला खडसेंची कीव येते’, गिरीश महाजन यांची खोचक टीका
"एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी पहिल्यांदा मी आतापर्यंत राजकारणामध्ये बघतो आहे. ते म्हणतात, मी त्यांना विनंती केली. प्रवेशही झाला. फोटोही काढले. पण ते मला घेतच नाही. एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही. मला एकनाथ खडसेंची आता कीव यायला लागली आहे", अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.
खान्देशात कधी एकेकाळी एकमेकांचे सहकारी असलेले दोन बडे नेते आता एकमेकांच्या विरोधात अतिशय टोकाचं बोलताना दिसत आहेत. आमदार एकनाथ खडसे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी अतिशय खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं. आपला दिल्लीत भाजपात पक्षप्रवेश झाला आहे. पण महाराष्ट्रात गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमुळे पक्षप्रवेशाची घोषणा होऊ शकली नाही. महाजन आणि फडणवीसांचा आपल्या पक्षप्रवेशाला विरोध आहे, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यावर आता गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांची अक्षरश: खिल्ली उडवली आहे. “एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी पहिल्यांदा मी आतापर्यंत राजकारणामध्ये बघतो आहे. ते म्हणतात, मी त्यांना विनंती केली. प्रवेशही झाला. फोटोही काढले. पण ते मला घेतच नाही. एवढी लाचारी मी आजपर्यंत बघितली नाही. मला एकनाथ खडसेंची आता कीव यायला लागली आहे”, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.
“एकनाथ खडसे हे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जाताना मी त्यांना बघितलं आहे. काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो. आमदाराची बॅग घेऊन ते फिरत होते. 90 च्या दशकामध्ये त्यांना पक्षामध्ये घेतलं, तिकीट दिलं आणि आमदार केलं. ते पंधरा ते वीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीतच फिरले. त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो. ते नंतर भाजपमध्ये आले. मात्र मी सुरुवातीपासून भाजपमध्येच आहे. मात्र काहीही बोलायचं, बडबड करायची आणि तुमची बोंब का पडत नाही? तुमच्या मतदारसंघात का तुम्ही त्या ठिकाणी पडले?”, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.
‘काय बोंब पडली? त्या ठिकाणी लोक शिव्या घालतात’
“तुमची कुठलीही ग्रामपंचायत तरी आहे का? तुमच्या मतदारसंघात नगरपालिका तरी आहे का? तुमचे मतदारसंघात काय आहे? एकदा चौदाशे मतांनी निवडून यायचं, एकदा 1800 मतांनी निवडून यायचं, तुमचा आणि माझा मताधिक्य पाहा केवढा आहे तो. जामनेर तालुका माझ्यामुळे सुजलाम सुफलाम झाला, एवढं हास्यास्पद वक्तव्य त्यांनी केलं. मुक्ताईनगरची अवस्था काय आहे? काय बोंब पडली? त्या ठिकाणी लोक शिव्या घालतात. महिना-महिनाभर त्या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये पाणी मिळत नाही. तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे विकास करायला का आले? बँक असेल, दूध संघ असेल, सर्व ठिकाणी आम्ही त्यांना नामोहरण केलं. जिल्हा दूध संघामध्ये चाळीसगावचे मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगरमध्ये जाऊन घरच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव केला”, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
“पारोळ्याचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी त्यांना चांगले सुनावले की, पोरीची निवडणूक आली की पोरीचं काम करायचं. सूनेचं काम आलं की, सूनेचं काम करायचं. यांची कमाल किती आहे, दुसरीकडे कोणी नको सगळ्या ठिकाणी आम्हीच पाहिजे, ही भूमिका त्यांची आहे आणि हे लोकांना कळायला लागलं आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
‘मी बोलायचं म्हटलं तर पळता भुई होईल’
“त्यांनी कितीही अश्लील आणि काहीही बडबड केली तरी माझ्या मतदारसंघांमध्ये माझा जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. दोन रुग्ण मुंबईला घेऊन जायची तरी बोंब पडली का तुमची एवढ्या वर्षांमध्ये? केवळ पद भोगायची, बडबड करायची, एवढेच कामं त्यांच्याकडे राहिले आहेत. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे ते वाह्यात सारखं काही बोलत आहेत. बोलण्यासारखं तर माझ्याकडे सुद्धा खूप आहे. मी बोलायचं म्हटलं तर त्यांना पळता भुई होईल. वेळ येईल त्यावेळेस मी नक्की बोलेन”, असा इशाराच गिरीश महाजन यांनी खडसेंना दिला.