‘भाऊ, हे दारूचे हप्ते घेतात’, भर बैठकीत पालकमंत्र्यांसमोर आमदाराची तक्रार
जळगाव जिल्हा नियोजन समिती बैठकीत गावठी दारुबंदी करण्यावर चर्चा सुरु होती. जिल्ह्यात सर्रासपणे गावठी दारु विकली जाते, असं स्वत: मोठमोठे लोकप्रतिनिधी बोलताना दिसले. या बैठकीतला व्हिडीओ समोर आला आहे.
जळगाव | 22 जुलै 2023 : राज्य सरकारने नुकतंच हातभट्टी मुक्त गाव योजनेची घोषणा केली आहे. बनावट दारु विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिले आहेत. हातभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी आता राज्य सरकार चांगलंच आक्रमक झालं आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस आणि राज्य उत्पादक शुल्क अधिकाऱ्यांची पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची तक्रार केली. मंगेश चव्हाण यांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांवर हातभट्टी चालवणाऱ्यांकडून हप्ते घेतले जातात, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला. यावेळी गिरीश महाजन यांनी देखील चिंता व्यक्त केली.
दरम्यान, वरिष्ठ अधिकारी या बैठकीला न आल्याने मंत्र्यांनी थेट निरीक्षकाला बैठकीत फोन करायला लावला. यावेळी निरुत्तर झालेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दारू विक्री विरुद्ध धाडी घालण्याचे आदेश देत जिल्हा गावठी दारुतून वॉश आउट करा, असे आदेशही या बैठकीत दिले.
जिल्हा नियोजन समितीत नेमकं काय संभाषण झालं?
गुलाबराव पाटील : 10 रुपयात मिळते ती आणि मग…
गिरीश महाजन : अरे लहान-लहान मुलं, 11-12 वर्षाची पोरं प्यायला लागली. लोकं मरुन जातील. तुम्ही काय करताय?
पोलिसाचा आवाज : कारवाई सुरुय सर
गिरीश महाजन : तुम्ही काय करताय? तुमचं काय काम आहे? हप्ते घेण्याचं काम आहे का आपलं? काय ऐकलं तुम्ही?
आमदार मंगेश चव्हाण : भाऊ, दारु या विषयावर ना… हे हप्ते घेतात सर्व. काय बोलायचं? तुम्ही दारुच्या बाबतीत, मी तुमच्याकडे किती वेळेस तक्रारी केल्या. तरी तुम्ही ऐकायला तयार नाहीत. मी सीएमपर्यंत तक्रारी केल्या. प्रत्येक ढाब्यावर दारु विकत आहेत. आता आम्ही सामोरं जायतं का?
गिरीश महाजन : उद्यापासून एकाही दुकानावर आणि हायवेवर कुणी अशी दारु विकता कामा नये. गावागावात हातभट्ट्या झालेल्या आहेत.
मंगेश चव्हाण : काल त्या विधीमंडळात इतके वाद झाले…भाऊ, 29 बार आहेत, भडगाव-चाळीसगाव रस्त्याला, चाळीसगाव-कन्नड, एकाचं सुद्धा लायसन्स नाहीय. तुम्ही काय डोळे लावून चालतात का? आता मी जावूनच करणार की हे दारु विकणार
बैठकीनंतर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
गुलाबराव पाटील यांनी बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली. “पवची नावाची एक दारु आहे. ती दहा रुपयात मिळते. ती दारु मुलगा प्यायला लागला तर वर्ष-दोन वर्षात तो मरतो. अशी बरीच उदाहरणं दिसायला लागली आहेत. त्यामुळे यावर कंट्रोल दिसलं पाहिजे. उत्पादक विभागाचे अधिकारी आणि पोलिसांना सूचना दिल्या आहेत. कारण मागच्यावेळेस माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने अशाप्रकारची दारु विकली जाते, असा आरोप केला होता. त्यामुळे अशा प्रकारे दारु करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश बैठकीत दिले”, अशी गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.