सेवानिवृत्तीला फक्त सात महिने उरले होते; बीएसएफ जवानाने घेतला अखेरचा श्वास
सात महिने सेवानिवृत्तीला राहिले असताना दुःखद घटना घडली. परेड सुरू असताना त्याच्या छातीत दुखायला लागले. प्रदीप यांना दवाखान्यात हलवण्यात आले.
खेमचंद कुमावत, प्रतिनिधी, चाळीसगाव : प्रदीप नाना पाटील हे कोदगाव येथील भूमिपुत्र आहेत. त्यांचे वडील नाना आप्पा हे बागायतदार शेतकरी. त्यांना तीन मुले. मोठा बाबाजी, दुसरा सतीश हे दोन्ही भाऊ शेती आणि पोल्ट्री व्यवसाय करतात. घरी सधन कुटुंब आहे. लहान भाऊ प्रदीप २००३ साली बीएसएफमध्ये भरती झाला. प्रदीप मनमिळाऊ आणि संयमी होता. सीमेवरून सुटीमध्ये घरी जायचा तेव्हा गावातील लोकं त्याला भेटायला येत. सात महिने सेवानिवृत्तीला राहिले असताना दुःखत घटना घडली. परेड सुरू असताना त्याच्या छातीत दुखायला लागले. प्रदीप यांना दवाखान्यात हलवण्यात आले. दोन-तीन दिवस प्रकृती बरी नव्हती. १३ मार्च रोजी सकाळी सहा वाजता प्रदीप यांनी अखेरचा श्वास घेतला.
असे आहे कुटुंब
प्रदीप यांचा मुलगा सहाव्या वर्गात आहे. तर मुलगी ही चौथीत शिकते. प्रदीप यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. पत्नीचे नाव ज्योती पाटील असे आहे. सात महिन्यांनंतर आपण घरी जाऊ, असे प्रदीप यांना वाटत होतं. घरचे लोकंही ते लवकरच सोबत राहायला येणार म्हणून खुश होते. पण, नियतीने घात केला. अचानक प्रकृती खराब होऊत कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला. सेवानिवृत्ती जवळ येत असताना त्यांनी ड्युटी वाढवून घेतल्याची माहिती आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र शहीद प्रदीप नाना पाटील यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावच्या दिशेने गेले. फुलांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या वाहनात त्यांचं पार्थिव कोदगाव येथे नेण्यात आले. BSF जवान प्रदीप नाना पाटील यांना आसाम येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते. चाळीसगाव शहरातून त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत भारत मातेचा जयघोष करत पार्थिवावर फुलांचा वर्षाव केला आहे. कोदगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कुटुंबीयांना मोठा हादरा
प्रदीप पाटील यांच्या अंत्यसंस्कारात प्रचंड गर्दी होती. परिसरातील हजारो लोकं या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी आले होते. पत्नी ज्योती यांना अश्रू अनावर झाले होते. सहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलावर आपल्या वडिलांना मुखाग्नी देण्याची वेळ आली. चौथ्या वर्गात शिकणारी मुलगी आपल्या वडिलांच्या आठवणीत रमली होती. वडिलांचा चेहरा त्यांना स्वस्त बसू देत नव्हता.