‘लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार’, बड्या नेत्याचा मोठा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही अशक्य नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गेल्या साडेचार वर्षांपासूनच्या घडामोडी वारंवार या गोष्टीची जाणीव करुन देत आहेत. विशेष म्हणजे आता तर शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करु शकतात, असं वक्तव्य केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानंतर आता महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत प्रादेशिक पक्षांबाबात केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणूक किंवा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस बरोबर जाणार किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करतील, असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत सर्वात मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“पराभव जवळ दिसू लागल्याने शरद पवारांनी वक्तव्य केलं आहे. लोकसभेनंतर शरद पवारांची पार्टी आणि ठाकरेंची पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन. या निवडणुकीनंतर त्यांची शिवसेना काँग्रेस बरोबर विलीन होणार आहे”, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात आपल्या भाषणात केलं.
‘ही निवडणूक गल्लीची नसेल तर दिल्लीची’
“स्मिताताई वाघ येणाऱ्या 4 तारखेला भारताच्या संसदेमध्ये खासदार म्हणून निवडून जाणार आहेत. एवढ्या तापमानामध्ये आपण सभेला उपस्थित आहात. मोठ्या मताधिक्याने आपण ताईला निवडून आणणार असा संकल्प आपण केला आहे. ही निवडणूक गल्लीची नसेल तर दिल्लीची आहे हे सांगण्याकरता मी उभा आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले. “उद्धव ठाकरे जळगावला आले होते. देशाच्या विकासाचा त्यांच्या भाषणात एकही मुद्दा नव्हता. त्यांनी भाषणात मोदींना शिव्या दिल्या. त्यांची नेता नीती नसलेली आघाडी आहे”, अशी टीका फडणवीसांनी केली.
“निवडणुकीचा काळ आहे. सर्वच गोष्टी सार्वजनिक करायचा नसतात. उन्मेष पाटील यांनी आत्मचिंतन करायला पाहिजे की त्यांचे तिकीट का कापलं? उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून आम्ही त्यांना वाचवलं. ही निवडणूक साधी निवडणूक नाहीय. या निवडणुकीमध्ये देशाचा नेता निवडायचा आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका
“या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना मिळून आपली महायुती तयार झाली आहे. दुसरीकडे राहुल गांधी हे त्यांच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी, कोणाला नेता मानायला तयार नाहीत. जो तो म्हणतो मला पाहा आणि फुला. सर्वांना मोदीजींच्या ट्रेनमध्ये बसवून सबका साथ सबका विकास म्हणत आपली ट्रेन विकासाच्या दिशेने जातेय. तर राहुल गांधींकडे फक्त इंजिन आहे. त्यांच्या ट्रेनला बोग्या नाहीत. या आघाडीमध्ये फक्त इंजिन आहे. इंजिनमध्ये सर्वसामान्य लोकांना बसायला जागा नसते”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
फडणवीसांनी वाचला केंद्र सरकारच्या कामांचा पाढा
“जे लोक तुम्हाला इथे येऊन काय त्यांना अहिराणीमध्ये सांगा. डोका मा नाही भुसा आणि कोठे पण पुसा. माता बहिणींसाठी मोदीजींनी जे काम केलं आहे याआधी देशात कोणीच केलं नव्हतं. महिलांना अधिकार देणारा नेता कोणी असेल तर नरेंद्र मोदी आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाकरिता मोदीजींनी काम केलं. आज आदिवासी बांधवांसाठी मोदीजींनी 24 हजार कोटींची योजना आणली. भारतात पहिल्यांदा आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं. अशा प्रकारच्या राष्ट्रपती या पंतप्रधान पेक्षा मोठे असतात. पंतप्रधान यांना काढण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो”, असं फडणवीस म्हणाले.
“गाव गाड्यांमध्ये 12 बलुतेदारांचा विचार पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी केला. महाराष्ट्रात सिंचनासाठी 50 हजार कोटी रुपये दिले. मोदीजींना शेतकऱ्यांची चिंता होती आणि त्यांनी हा निधी दिला. युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे शेतमालाचे भाव पडले. आम्ही मोदींना सांगितलं शेतकऱ्यांना मदत करा. आचारसंहितेनंतर शेतकऱ्यांना कापसाच्या अनुदान आम्ही देणार आहोत. काँग्रेस एक लाख कोटी खर्च करायचे मोदी वर्षाला 13 लाख कोटी खर्च करतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“भारताला बदलण्याचा काम नरेंद्र मोदींनी केलं आहे. ज्यावेळी लोकांना येत नाही त्यावेळेस कन्फ्युज करण्याचे काम होतं. महाविकास आघाडीचे पोपट मिठू मिठू बोलायला लागले. जगात खोटं बोलण्याचं कॉम्पिटिशन ठेवलं तर सर्व मेडल महाविकास आघाडीला मिळतील. मोदीजींनी सांगितलं आहे, डॉ. बाबासाहेबा आंबेडकर यांचे संविधान हे गीता, बायबल, कुराण पेक्षा मला महत्त्वाचं आहे. संविधानाची रक्षा करणारे मोदी आहेत”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीसांची काँग्रेसवर टीका
“1975 मध्ये दोन वर्ष भारताचे संविधान बंद करून इंदिरा गांधींनी तानाशाही आणली होती. माझा सवाल आहे. आरक्षण देणारे आणि संविधान लावणारे नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक बाबासाहेबांचा दोनदा पराभव केला. देशाला विकासाच्या मार्गाने घेऊन जाणाऱ्या वाघाचं नाव नरेंद्र मोदी आहे. ही गल्लीची नाही तर दिल्लीची निवडणूक आहे. कोविडच्या काळात राहुल गांधी पंतप्रधान असते तर काय झालं असतं?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. घराबाहेर पडले नाही. कोविडची लस आपल्याच देशात नरेंद्र मोदींनी तयार करून घेतली. जगामध्ये लस बनवणारा भारत पाचवा देश होता. 140 कोटी लोकांना दोन वेळा लस मोफत दिली. शंभर देशाचे नेते म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर नरेंद्र मोदी असेल. आमचा नेता साधा नाही. या ठिकाणी राहुल गांधी असते तर ते म्हटले असते इधर से आलू टाकतो तिकडून सोनं काढतो”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.