एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला गिरीश महाजन यांचा विरोध? खडसेंवर सडकून टीका
"काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय-काय बोलत होते, त्यांच्या क्लीप आपण दाखऊ शकता. नरेंद्र मोदी पंतप्रधान असतानाच ते तिकडे गेले आहेत. भाजपमध्ये असताना 30 वर्ष तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरले, आणि एकदाच आपली कन्या हरल्यानंतर लगेच पक्ष तुमचा दुश्मन झाला, लगेच तुम्ही पार्टी बदलली? मग आता कसं तुम्हाला मोदी यांचं काम चांगलं असल्याचा साक्षात्कार झाला हे कळत नाही", अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी स्वत: याबाबत घोषणा केली आहे. पण त्यांच्या घरवापसीच्या निर्णयाला भाजपमधील काही नेत्यांचा विरोध असल्याचं दिसत आहे. खडसे यांच्या घरवापसीमुळे भाजपचे काही नेते नाराज आहेत. विशेष म्हणजे जळगावातील भाजपचे बडे नेते गिरीश महाजन यांनी तर एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यामुळे या टीकेतून त्यांना एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला विरोध करायचा आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. खडसे भाजपमध्ये असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगलेलं असायचं. पण खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर महाजनांनी उघडपणे त्यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली होती.
“एकनाथ खडसे यांना आता अचानक मोदींचे काम चांगले असल्याचा साक्षात्कार कसा झाला? भाजपमध्ये असताना 30 वर्ष तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत फिरले, आणि एकदाच आपली कन्या हरल्यानंतर लगेच पक्ष तुमचा दुश्मन झाला, लगेच तुम्ही पार्टी बदलली?”, असा सवाल गिरीश महाजन केला. “सून एका ठिकाणी, मुलगी एका ठिकाणी, तर ते स्वतः दुसऱ्या ठिकाणी असे सोईचे खडसेंचे परिवारवादाचे राजकारण आहे. त्यामुळे शरद पवार यांना पश्चात्ताप होणारच आहे”, अशी टीका करत मंत्री महाजन यांनी एकप्रकारे खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध केला आहे.
‘खडसेंनी सोईचे राजकारण केलं’
एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला ही आपली मोठी चूक झाली असल्याची कबुली शरद पवार यांनी माजी मंत्री सतीश पाटील यांच्याकडे दिली होती. या विषयावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “बरोबर आहे. त्यांचं काही चूकच नाही. कारण खडसे यांनी आपल्या सोईचे राजकारण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. सून एका ठिकाणी, मुलगी एका ठिकाणी, तर ते स्वतः दुसऱ्या ठिकाणी असे सोईचे आणि एकाच घरात सत्ता राहणारे, परिवार वादाचे राजकारण त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. शरद पवार यांना पश्चात्ताप होणारच आहे.”
‘खडसे महायुती येत असतील तर आम्हाला आनंद’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री अनिल पाटील यांनीदेखील खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांनी त्यांची चूक कबूल केली असेल. शरद पवार गटात जी मंडळी असेल ती मंडळी खडसेंना आवडत नसेल. त्यामुळे खडसेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. खडसे यांना विधान परिषदेत उमेदवारी द्यावी इथपर्यंत शरद पवार यांचा निर्णय योग्य होता. तसेच खडसे यांना विधान परिषदेत निवडून आणण्याचं कर्तव्य अजित पवार यांनी पार पडलेलं आहे. त्यामुळे खडसे आता महायुती येत असतील तर आम्हाला आनंद आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.