जळगाव : भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना मोठा इशारा दिलाय. ‘मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे’, अशा शब्दांत गिरीश महाजनांनी इशारा दिलाय. गिरीश महाजन यांना मुलगा असता तर तोही राजकारणात असता, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाला गिरीश महाजनांनी आज प्रत्युत्तर दिलं. यावेळी महाजनांनी एकनाथ खडसे यांना एक मुलगा होता. त्यांच्या मुलाचा मृत्यू कसा झाला? हे तपासण्याची गरज आहे, असं विधान केलं.
“एकनाथ खडसे यांनी परवा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातही सुदैवाने गिरीश महाजनांना मुलगा नाही, असं वक्तव्य केले. मला दोन मुली असून मी त्यांना राजकारणात आणलेलं नाही. मला त्याचा आनंद आहे. पण माझा खडसेंना प्रश्न आहे की त्यांनाही मुलगा होता. त्याचं काय झालं? याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला? हे तपासण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका, यातच खडसेंचं भलं आहे”, असा इशारा गिरीश महाजन यांनी दिला.
“एकनाथ खडसे आजकाल काय बोलताय त्याचं त्यांना भान राहत नाहीय. ते बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत. कधी मला चावट म्हणताहेत, तर कधी बदनामी करा म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. त्यांच्या अनेक ठिकाणच्या भानगडी, चौकशा यात सबळ पुरावे मिळत आहेत म्हणून ते अस्वस्थ झाले आहेत”, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला.
“तुमच्या मागे ईडी लागली, तुमच्या कर्तृत्व तसं होतं. भोसरीमध्ये तुम्ही काय-काय केलं हे समोर येतंय, लवकरच अजून समोर येईल. भोसरी प्रकरणात तुमचा जावई 17 महिन्यांपासून जेलमध्ये आहे. त्याचा जामीन तुम्ही का करत नाहीत?”, असा सवाल महाजनांनी केला.
“माझ्यावर खडसेंनी मोक्का लावला हे सांगायची गरज नाही. एकनाथ खडसे, वकील प्रवीण चव्हाण, पोलीस अधिकाऱ्यांनी रचलेले षडयंत्र पेन ड्राईव्हने समोर आलंय. आता मला मोक्का लावला त्याची आणि खडसेंची ईडीची चौकशी होतेय, आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल”, असं गिरीश महाजन म्हणाले.