’21 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आपल्या जावायाला आधी सोडा, मग…’, गुलाबराव पाटील एकनाथ खडसे यांच्यावर बरसले
"21 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आपल्या जावायाला जेलमधून आधी सोडा आणि मग मुख्यमंत्र्यांवर आरोप करा", असा घाणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर केला.
अनिल केऱ्हाळे, जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधलाय. विशेष म्हणजे यावेळी गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर टीका करतांना त्यांच्या जावायांचा उल्लेख केलाय. त्यामुळे गुलाबराव आणि खडसे यांच्यातील राजकीय वाद आणि कुटुंबापर्यंत आलाय की काय? अशी परिस्थिती निर्माण झालीय. कारण यावेळी गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना त्यांच्या जावायाला जेलमधून बाहेर का काढत नाहीत? असा थेट प्रश्नच विचारला आहे.
“माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मला राजीनामा द्यावा लागला होता. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा द्यावा”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीबद्दल गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी खडसेंना थेट त्यांच्या जावायाबद्दल प्रश्न विचारला.
“21 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आपल्या जावायाला जेलमधून आधी सोडा आणि मग मुख्यमंत्र्यांवर आरोप करा”, असा घाणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर केला.
गुलाबराव पाटील यांनी नेमकी टीका काय केली?
“पहिले जावायाला सोडवावं ना? आपला जावाई 21 महिन्यांपासून कशामुळे जेलमध्ये आहे? त्यांना सोडवा. ते साधूसंत आहेत का? कशाकरता जेलमध्ये गेले?”, असे प्रश्न गुलाबराव पाटील यांनी खडसेंना उद्देशून उपस्थित केले.
“कृपया त्यांनी त्यांच्या जावायाला बाहेर काढावं. मग मुख्यमंत्र्यांवर आरोप करावे. आपण काय सांगताय? भोसरी काय गुलाबराव पाटलांनी केलेय का? आपण बाळू लोकल काळू, असं कसं चालेल”, अशी खोचक टीका गुलाबराव पाटील यांनी केली.