जळगाव महापालिकेत धक्कादायक प्रकार, कर्मचारी महिलेच्या ऐवजी तिचा पती करतोय काम
जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागात एका कंत्राटी महिला कर्मचाऱ्याच्या पतीने तिच्या जागी काम केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री कौशल्य योजनेअंतर्गत नियुक्त झालेल्या महिलेच्या ऐवजी तिचा पती गेल्या 10 ते15 दिवसांपासून काम करत होता.
किशोर पाटील, Tv9 मराठी, प्रतिनिधी : जळगाव महापालिकेत नियुक्त ऑपरेटर कंत्राटी कर्मचारी महिलेच्या ऐवजी तिचे पती काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंद विभागात ऑपरेटर कंत्राटी कर्मचारी महिलेच्या ऐवजी तिच्या जागेवर गेल्या 10 ते 15 दिवसांपासून तिचे पती काम करत असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री कार्य – कौशल्य योजनेअंतर्गत महिलेची महापालिकेत जन्म-मृत्यू नोंद विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली आहे. सदर कर्मचारी महिलेच्या ऐवजी जन्म-मृत्यू नोंद विभागात चक्क तिचे पती काम करत असल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिकेत यंत्रणेत खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे.
या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आला असून प्रकाराबाबत जन्म-मृत्यू नोंद विभागाच्या विभाग प्रमुखांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. अहवाल तसेच स्थळ निरीक्षण अहवाल आल्यानंतर विभागप्रमुख संबंधित महिला तसेच तिचे पती यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, महिला ऐवजी तिचा नवरा गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून काम करत असतानाही ही बाब महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कशी लक्षात आली नाही? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. या कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महिलेच्या पतीचं उत्तर काय?
जन्म-मृत्यू हा महत्त्वाचा विभागातून या विभागांतर्गत प्रमाणपत्र देण्यात सदरच्या व्यक्तीकडून काही चूक झाली असेल तर त्याला जबाबदार कोण? असाही सवाल आता उपस्थित होत आहे. दुसरीकडे माझ्या पत्नी ऐवजी मी गेल्या चार ते पाच दिवसांपासून येत असून याबाबत विभाग प्रमुख यांची परवानगी घेतल्याचं सरळ उत्तर संबंधित महिलेच्या पतीने स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिली. धक्कादायक बाब म्हणजे या काळात या संबंधित महिलेच्या पतीने एकच दिवसात दहा ते पंधरा दाखले वाटप केल्याचं सांगितलं.
जन्म-मृत्यू नोंद विभागाच्या विभाग प्रमुखांकडून स्पष्टीकरण काय?
कर्मचारी महिला जेवणाला गेल्यामुळे तिच्या ऐवजी तिच्या पतीला काम करायला सांगितलं. या दरम्यान त्यांनी कुठलेही दाखले दिलेले नसल्याचं स्पष्टीकरण जन्म-मृत्यू नोंद विभागाच्या विभाग प्रमुखांनी दिलं आहे. तसेच यापुढे कर्मचाऱ्यांनी गणवेशात यावं जेणेकरून बाहेरचा कोण आणि कर्मचारी कोण हे कळेल अशी सारवासारव सुद्धा बोलताना विभाग प्रमुखांनी केली.
संबंधित प्रकाराचा अहवाल विभाग प्रमुखांकडून मागवण्यात आलेला आहे. तसेच स्थळ, निरीक्षण अहवाल सुद्धा मागवण्यात आला आहे. अहवाल आयुक्तांना पाठवण्यात येणार असून विभाग प्रमुख संबंधित महिला आणि तिचे पती यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं उपायुक्त अश्विनी गायकवाड यांनी सांगितलं आहे.