जळगाव | 21 ऑक्टोबर 2023 : राज्यात सध्या नवरात्रीचा उत्साह आहे. दोन दिवसांवर दसरा येऊन ठेपला आहे. दसऱ्यानंतर लगेच काही दिवसांनी दिवाळी सण येतो. त्यामुळे राज्यात सध्या सणांचा चांगला उत्साह असणार आहे. दिवाळीनंतर लगेच लग्न सराईत सुरु होणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण असणार आहे. या आनंदाच्या दिवसांमध्ये अनेकजण सोने, दागिने खरेदी करतात. दसऱ्याच्या दिवशीदेखील सोने खरेदी करण्यासाठी नागरिकांची सराफ दुकानात गर्दी बघायला मिळते. याशिवाय दिवाळीच्या दिवसांमध्ये अनेक जण सोने खरेदी करतात. कुणी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करतात. त्यामुळे आगामी काळात सोन्याची चांगली मागणी वाढण्याची शक्यता आहे. असं असताना सोन्याच्या भावात चांगलीच वाढ झाल्याची माहिती समोर आलीय.
संपूर्ण देशात सूवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील इस्त्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जळगावच्या सुवर्णनगरीवर मोठा परिणाम पडल्याचं पाहायला मिळत आहे. पितृपक्षामध्ये 57 हजार रुपये पर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर पुन्हा वधारले असून अवघ्या पंधरा दिवसांध्ये सोन्याच्या भावामध्ये 4 हजार 200 रुपयांनी वाढ झालीय. जळगावात सोन्याचे दर 61 हजार 200 रुपयांपर्यंत जावून पोहचले आहेत.
इस्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम हा सोन्याच्या बाजारावर सुद्धा झालाय. सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जात असल्याने युद्धामुळे इतर ठिकाणची गुंतवणूक ही सोन्यात वळती झालीय. इतरही फंड हे सोन्याकडे वळले आहेत. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झालीय. परिणामी सोन्याचे दर हे 61 हजार 200 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
सोन्याचे भावात वाढ झाली असली तरी सूवर्ण नगरीतील सराफा दुकानामध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. आगामी काळात दसरा, दिवाळी सण आहेत. लग्न सराई सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे भाव वाढ झाली असली तरी त्याचा ग्राहकांवर कुठलाही परिणाम झालेला नाही, असं सोने व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
पितृपक्षातील सोन्याचे भाव : 57 हजार रुपये
24 कॅरेट सोन्याचे आजचे दर प्रती 10 ग्रॅम : 61 हजार 200
22 कॅरेट सोन्याचे आजचे दर प्रती 10 ग्रॅम : 56 हजार 60
चांदीचे आजचे भाव: 74 हजार