जळगावः जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेली एक चटका लावणारी घटना. एका अकरावीत शिकणाऱ्या नांद्रा येथील 17 वर्षांच्या तरुणाचा गिरणा नदीच्या डोहात बुडून मृत्यू झालाय. हर्षल संजय तावडे असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अशी घडली घटना
माहिजी येथील गिरणा नदीपात्रात हर्षल दुपारी एकच्या सुमारास पोहायला गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचे मित्र होते. मात्र, पोहताना हर्षलला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडाला. त्याच्या मित्रांनी जोरात आरडा-ओरडा केला. तेव्हा हर्षलचा शोध घेऊन नावेकरांनी त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. हर्षल सध्या अकरावीला होता. तो जळगाव येथील बबनभाऊ बाहेती महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. त्याचे वडील संजय तावडे हे शेतकरी आहेत. त्यांना दोन मुले होती. त्यात हर्षल सर्वात लहान आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीमुळे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. दरम्यान, अशीच घटना गेल्या महिन्यात नाशिकमध्ये घडलीय. मखमलाबाद रोड परिसरात समर्थनगर येथे एक कालवा आहे. या ठिकाणी अनेक मुले खेळायला जातात. गजवक्रनगर भागात असलेल्या नामको कॅन्सर हॉस्पिटलमागे राहणारी तीन मुले या ठिकाणी खेळण्यासाठी गेले होते. मात्र, कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. ही खेळायला गेलेली मुले पोहण्यासाठी कालव्यात उतरली, पण पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे तिघेही पाण्यात बुडाली. नीलेश मुळे, प्रमोद जाधव आणि सिद्धू धोत्रे अशी तिघांची नावे आहेत.
तर दुर्घटना टाळता येते
पालकांनी आपले मूल खेळायला कुठे जात आहे, यावर जरूर लक्ष ठेवावे. शक्यतो मुलांना घराबाहेर खेळायला पाठवताना एकट्याला पाठवू नये. त्याच्यासोबत कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असावीच. पाणी साचलेले मोठे खड्डे, खाण, विहीर, तलाव इत्यादी ठिकाणी मुलांना खेळायला एक तरी पाठवू नये. पाठवले तर त्यांच्यासोबत घरातीलच कोणीतरी व्यक्ती असावी. अन्यथा मुले पाणी कमी आहे म्हणून पाण्यात उतरतात. अनेकदा मुलांचा पाय घसरतो. असे काहीही होऊ शकते. त्यामुळे पुढची दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.
इतर बातम्याः
Nashik Corona| कोरोना लस घेतल्याशिवाय सप्तश्रृंगीचे दर्शन नाही; इतरही नियम कडक, जरूर जाणून घ्या…!
Nashik|मालेगावमध्ये कोरोना लसीकरण नोंदणीत घोळ, चौकशीपूर्वीच 10 शिक्षकांचे निलंबन रद्द