किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ करत असल्याचे दिसून येत आहे. महिला डॉक्टर संतापाच्या भरात रुग्णाच्या नातेवाईकाला शिवीगाळ करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारासंदर्भात संबंधित रुग्णाच्या नातेवाईकासह ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे शिवीगाळ करणाऱ्या महिला डॉक्टर विरोधात लेखी तक्रार केली आहे. या प्रकरणी कारवाईची मागणी केली जात आहे.
महिला डॉक्टर शिवीगाळ करत असतानाचा व्हिडिओ सुद्धा असून त्या आधारावर त्या महिला डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवीगाळ करणारी महिला डॉक्टर बरोबरच आणखी एक महिला डॉक्टर रुग्णांना चुकीची वागणूक देत असल्याचा सुद्धा तक्रार अर्जात म्हटलं आहे. महिला डॉक्टर विरोधात करण्यात आलेल्या तक्रार अर्जावर संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांच्या सुद्धा स्वाक्षऱ्या आहेत.
या प्रकरणात नेमकी कुणाची चूक आहे? ते अद्याप स्पष्टपणे समजू शकलेलं नाही. महिला डॉक्टर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहे. तर दुसरीकडे रुग्णाचा नातेवाईकही आवाज चढवून तिच्याशी बोलत आहे. या सर्व प्रकरणात महिला डॉक्टर इतकी का संतापली आहे? ते समजून घेणं देखील जास्त महत्त्वाचं आहे. तसेच रुग्णाच्या उपचारात कोणताही हलगर्जीपणा करण्यात आला असेल तर संबंधितांवर कारवाई होणं हे अपेक्षित आहे. कारण रुग्णांचे नातेवाईक खूप विश्वासाने डॉक्टरांकडे आपल्या रुग्णांना घेऊन जात असतात. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसोबत सौजन्याने वागणं देखील जास्त आवश्यक आहे. कारण रुग्णाला काय झालं आहे, त्याचावर उपचार केल्यानंतर तो कधीपर्यंत बरा होऊ शकतो? याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित माहिती देणं अपेक्षित आहे. रुग्णाच्या उपचारात कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा झाला असेल तर या प्रकरणात कारवाई होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे.