महाराष्ट्राच्या राजकारणात नवा बॉम्ब, जळगावच्या तत्कालीन एसपींचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. अनिल देशमुख यांच्यावर जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी गंभीर आरोप केले आहेत.त्यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी घोटाळ्यांचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांमुळे त्यांना एक वर्षापेक्षा जास्त वेळ जेलमध्ये राहावं लागलं आहे. यानंतर आता अनिल देशमुख यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी आपल्याला धमकी दिली होती, असा मोठा आरोप प्रवीण मुंढे यांनी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा धक्कादायक आरोप प्रवीण मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या आरोप प्रकरणात महाविकास आघाडी सरकार काळातील विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचादेखील जबाब सीबीआयकडून नोंदवला गेला होता. मुंढे यांनी आपल्या जबाबात अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणामुळे राजकारण तापण्याची जास्त शक्यता आहे.
प्रवीण मुंढे यांचे नेमके आरोप काय?
“गिरीश महाजन यांच्यावरील गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता”, असा आरोप प्रवीण मुंढे यांनी आपल्या जबाबात केला. अनिल देशमुख यांनी जवळपास चार ते पाच वेळा तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांना फोन केले होते. तसेच धमकीची सुद्धा भाषा वापरली होती. त्यांनी जबरदस्तीने गिरीश महाजन यांना या गुन्ह्यात कशाप्रकारे अडकवण्यात येईल, यासाठी कट रचला होता, अशा प्रकारचा अहवाल सीबीआयने कोर्टात दाखल केला आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी सिस्टीमवरील दबाव टाकला होता. तसेच देशमुख प्रवीण चव्हाण यांना एसपींकडे पाठवत होते, असं सीबीआयने म्हटलं आहे.
सीबीआयने पुण्याच्या न्यायालयात सविस्तर अहवाल दाखल केला आहे. या अहवालात प्रवीण मुंढे हे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्यावर कशाप्रकारे अनिल देशमुख यांनी गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला याबद्दल सविस्तर मांडण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप
भाजपच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीनंतर सध्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांवर प्रतिक्रिया दिली. “सीबीआयने आता जी चार्जशीट दाखल केली आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की, गिरीश महाजन यांच्यावर कशाप्रकारे मोक्काचा गुन्हा लागला पाहिजे यासाठी वारंवार अनिल देशमुख यांच्याकडून गृहमंत्री म्हणून दबाव टाकला आणि हे गुन्हे दाखल करायला लावले. खरं म्हणजे या संदर्भातील ऑडिओ आणि व्हिजवल पुरावे मी स्वत: दिले होते. त्यावरच सीबीआयकडे केस झाली. त्या केसमध्ये सीबीआयने पुराव्यासहीत कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. त्यामुळे मविआ सरकार काळात कशाप्रकारे विरोधी पक्षाच्या आमदारांवर मोक्का लावणे, खोट्या केसेस दाखल करणे, खोट्या केसेसमध्ये फेसवणू याची मोडस ऑपरेंडी होती हे सर्वांनी नीट बघितलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.