जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला अचानक काही दिवसांसाठी स्थगिती देण्यात आलीय. पण या स्थगितीमागे महत्त्वाचं कारण असल्याची माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत होत्या. त्यामुळे 10 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं होतं. असं असताना ही निवडणूक आता पुढे ढकलण्यात आलीय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा दूध संघाची 10 डिसेंबर रोजी होणारी निवडणूक 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलीय. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत.
राज्यात होऊ घातलेल्या 7 हजार 751 ग्रामपंचायतच्या निवडणूक कार्यक्रमामुळे ‘अ’ आणि ‘ब’ दर्जाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या 20 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता 20 डिसेंबरनंतर निवडणुकीची पुढील तारीख जाहीर होईल.
दरम्यान, दूध संघाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता उमेदवारांना पुढील निवडणूक तारीख जाहीर होण्याची वाट पाहावी लागणार आहे.