जळगावात पत्रकाराला भर रस्त्यात मारहाण, पोलिसांनी काय कारवाई केली, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
पत्रकाराला भर चौकात बेदम मारहाण झालीय. पण मारहाण करणारे आपले कार्यकर्ते नाहीच, असं आमदार किशोर पाटील म्हणतायत. मात्र शिवीगाळ केलीच होती हे ते पुन्हा मान्यही करतायत.
जळगाव | 10 ऑगस्ट 2023 : भर रस्त्यात लाथांनी मारहाण, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरच आक्रमण आहे. जळगावच्या पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना तिघांनी लाथांनी मारलं आणि ही भीती, त्यांनी 4 दिवसांआधीच व्यक्त केली होती. मारहाणीनंतर, संदीप महाजनांनी पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांवर आरोप केलाय. संदीप महाजन यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झालाय. संदीप महाजनांना रस्त्यात खाली पाडून, कोणी डोक्यावर लाथा मारतंय, कोणी तोंडावर मारतंय, अतिशय भयानक दृश्य आहेत. शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच मारहाण केल्याचा आरोप, पत्रकार संदीप महाजनांचा आहे. मात्र किशोर पाटलांनी आरोप फेटाळलाय.
गेल्या आठवड्यात जळगावच्या भडगाव तालुक्यात 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या झाली. या घटनेनंतर निघालेल्या मोर्चावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी मुलीच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. मात्र सांत्वनापलिकडे शिंदेंनी फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याचं आश्वासन द्यायला हवं होतं, असं म्हणत पत्रकार संदीप महाजनांनी लोकांच्या संतप्त भावना आणि मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी अशा शीर्षकाखाली बातमी दिली.
आमदाराकडून शिव्या दिल्याचं जाहीरपणे कबूल
याच बातमीचा राग शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना इतका आला की, त्यांनी पत्रकाराची आई बहीण काढत अर्वाच्च शिव्या दिल्या. इतक्यावरही आमदार महोदयाचं समाधान झालं नाही. तर त्यांनी धमकीही दिली. ती क्लीप व्हायरल झाली. त्यावर, होय मीच शिव्या दिल्या आणि त्याचा अभिमान आहे, अशी छातीठोक किर्तीप्रमाणं कबुलीही दिली.
आता 4 दिवसांतच, त्या पत्रकाराला भर चौकात बेदम मारहाण झालीय. पण मारहाण करणारे आपले कार्यकर्ते नाहीच, असं आमदार किशोर पाटील म्हणतायत. मात्र शिवीगाळ केलीच होती हे ते पुन्हा मान्यही करतायत. इतकंच नाही तर, आमदारांचं हेही म्हणणंय की, “आई-बहिणीशिवाय शिव्या तरी आहेत का?”. किशोर पाटलांच्या याच वक्तव्यावर सुषमा अंधारेंनी, त्यांना संजय शिरसाठ, संजय गायकवाड आणि अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचीही आठवण करुन दिली. त्यावर आपण त्यांचाही निषेधच केला असता असंही किशोर पाटील म्हणालेत.
आरोपी जामिनावर सुटले
मारहाण करणाऱ्या तिघांपैकी दोघांवर पोलिसांनी कलम 323 नुसार चाप्टर केस दाखल केली. मात्र तात्काळ तहसिलदाराद्वारे त्यांची जामिनावर सुटकाही झाली. मात्र पत्रकाराला मारहाण होऊनही पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेला नाही आणि अद्याप शिवीगाळ, धमकी प्रकरणातही शिंदेचे गटाचे आमदार किशोर पाटलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.