शरद पवार आणि अजित पवार खरंच एकत्र येणार? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? अजित पवार यांनी आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात? याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा राजकारणात एकत्र येणार का? असा प्रश्न शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारण्यात आला. जयंत पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आणि राजकीय घडामोडींवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. शरद पवार यांना नुकताच अजित पवार यांना सोबत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर शरद पवारांनी आपल्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन आपण त्याबाबतचे निर्णय घेऊ, असं म्हटलं होतं. शरद पवार यांच्या या उत्तरानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. या दरम्यान आज जयंत पाटील यांनादेखील अशाचप्रकारचा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
वाईट काळात जे सोबत राहिलेले आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेण्याच्या निर्णयाबाबत शरद पवार यांनी सांगितलेलं आहे. याबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारला असता, “शरद पवार यांना जे सोडून गेलेले आहेत त्यांच्या परतीबद्दल माझ्यात आणि शरद पवार यांच्यामध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही. ते परत येतील असं मला वाटत नाही. मात्र आले तर त्याबद्दल चर्चा करू. मात्र परत येण्यासंदर्भात आमच्याशी कोणीही चर्चा केलेली नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
अमित शाह यांची ठाकरेंवर टीका, जयंत पाटील म्हणाले…
अमित शाह यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. त्यावरही अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. “काहीतरी जुन्या गोष्टी करायच्या आणि काहीतरी चुकीची विधानं करायची. बेरोजगारी, महागाई तसेच शेतमालाला भाव नाही. हे मुख्य प्रश्न बाजूला राहिले आणि हे काय नवीन स्टेटमेंट करत बसले. औरंगजेब सारखेच लोक आहेत. त्यावर जाऊन शतकोनशतके झाली. मात्र तरीही त्यांच्या नावावर राजकारण करून मत मागायची”, असं जयंत पाटील म्हणाले.
“मला वाटत नाही की हे योग्य आहे. मला एवढंच वाटतं की हे सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलं नाही. पुन्हा आपण निवडून येणार नाहीत, अशी शंका असल्याने पुढच्या पंधरा दिवसात पाहिजे त्या घोषणा ते करतील. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे पाहिजे तशा घोषणा त्या पुढच्या काही दिवसांत करतील. महावितरण कंपनीला डुबवून शेतकऱ्यांना वीज बिल माफ संदर्भात कितीही मोठी घोषणा केली तरी त्याचा आता उपयोग होणार नाही”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील खडसेंना काय म्हणाले?
“एकनाथ खडसे यांच्याबद्दल मला काही माहीत नाही. तुम्ही हे सर्व प्रश्न खडसे यांना विचारले तर बरं होईल. एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला असता तर तो राजीनामा माझ्याकडे आला असेल. त्याबद्दलचं काय स्टेटस आहे हे मला आता सध्या माहीत नाही. तुम्हाला काय त्याची चिंता आहे मला हे कळत नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यात भेट का झाली?
“मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची का भेट घेतली याबाबत माझी शरद पवारांसोबत चर्चा झालेली नाही. सत्तेत बसणाऱ्या लोकांनी दोन्ही बाजूला काय आश्वासन दिले त्यानुसार निर्णय घ्यावा. याच्यात कसलंही राजकारण केलं जातं नाहीय. आरक्षणाच्या प्रश्नाकडे आम्ही राजकारण म्हणून पाहत नाही. सरकारने वेगवेगळ्या समाजाला जी आश्वासने दिली आहेत ती सरकारने पाळावी एवढी आमची अपेक्षा आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
‘महायुतीच्या सरकारला पराभूत करण्यासाठी राज्यातली जनता…’
“लाडक्या खुर्चीसाठी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांसारख्या योजना आहेत. महाराष्ट्रातील जनतेबद्दल कुठलीही आस्था किंवा सहानुभूती महायुतीच्या सरकारला नाहीय. भ्रष्टाचाराचा कळस या सरकारने केलेला आहे. अधिवेशनामध्ये जे आरोप केले त्याला उत्तर सुद्धा सरकारमधले मंत्री देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये या महायुतीच्या सरकारला पराभूत करण्यासाठी राज्यातली जनता एकत्र येईल असे मला वाटतं”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.