देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्ह बॉम्ब प्रकरणाशी संबंधित प्रकरणी जळगावात मोठी कारवाई
जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेतून कागदपत्रे चोरी झाल्याप्रकरणी वकील विजय पाटील यांची अटक झाली आहे. या प्रकरणात तत्कालीन विशेष सरकारी वकील आणि अन्य व्यक्तींचाही समावेश आहे. साडेतीन वर्षांनंतर दाखल झालेल्या या गुन्ह्याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह प्रकरणाशी आहे.
किशोर पाटील, Tv9 मराठी प्रतिनिधी, जळगाव : जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेतील कागदपत्र चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वकील विजय भास्कर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण, संजय पाटील, विनोद पाटील यांचाही समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे. विजय भास्कर पाटील यांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी राजकीय दबाव आणला, तसेच धर्मादाय आयुक्तांचा बंदी आदेश असताना बेकायदा घुसून संस्थेच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरी केल्याची तक्रार मविप्रचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. १९ जुलै २०२१ ची ही घटना असल्याचे तक्रारीत नमूद असून साडेतीन वर्षांनंतर जिल्हा पेठ ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेचा संबंध हा काही वर्षांपूर्वी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना विधानसभेच्या सभागृहात सादर केलेल्या पेन ड्राईव्ह बॉम्ब, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचा आरोप, तसेच गिरीश महाजन यांना मोक्का कायद्या खाली अडकवण्या संदर्भातील गुन्ह्याशी असल्याचे सुद्धा तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणामुळे राज्यात खळबळ
ही घटना कागदपत्र चोरीपुरता मर्यादित नसून त्यामागे नियोजित कट असल्याचे सीबीआयच्या चौकशीत आणि क्लोजर रिपोर्टमध्ये समोर आले. त्यामुळे साडेतीन वर्षांनी गुन्हा दाखल करीत असल्याचे तक्रारदार निलेश भोईटेंनी म्हटले आहे. राज्यात गाजलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्ब , गिरीश महाजन यांना मोक्का लावण्या संदर्भातील कारस्थान याच्याशी संबंध असल्यामुळे या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपधीक्षक, पोलीस निरीक्षक तसेच गुह्यांचे तपास अधिकारी यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ होत आहे.