जामनेर पोलीस ठाण्यावर जमावाकडून दगडफेक, मंत्री गिरीश महाजन यांनी थरार सांगितला
"मोठा जमाव पोलीस ठाण्यावर जमला आणि दगडफेकही झाली. या दगडफेकीची आक्रमकता जास्त असल्याने पोलीस जखमी झाले. तोडफोड झाली. या ठिकाणी भीतीचे वातावरण होते. पोलिसांकडून 15 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे", अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
जामनेर पोलीस ठाण्यावर काल रात्री जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही पोलीस कर्माचारीदेखील जखमी झाले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला आहे. संबंधित घटना ही अतिशय चित्त थरारक अशी होती. या घटनेची दखल मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली. गिरीश महाजन यांनी या घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच त्यांनी माध्यमांना या घटनेविषयी माहिती दिली. “जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारून फेकून देण्यात आल्याचा प्रकार घडलाय. सहा वर्षाची मुलगी खेळत असताना तरुणाने त्या मुलीला शेतामध्ये नेलं. तियाच्यावर अतिशय दुर्दैवीप्रकारे अत्याचार केला. हे कुणी केलं होतं हे सर्व डिटेक्ट झालंय. लोकांनी त्या आरोपीला आम्ही शिक्षा देतो म्हणत आमच्याकडे सोपवा, अशी मागणी केली. मात्र पोलिसांना तसं करता येत नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“मोठा जमाव पोलीस ठाण्यावर जमला आणि दगडफेकही झाली. या दगडफेकीची आक्रमकता जास्त असल्याने पोलीस जखमी झाले. तोडफोड झाली. या ठिकाणी भीतीचे वातावरण होते. पोलिसांकडून 15 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांकडे रेकॉर्ड असून व्हिडीओत दगडफेक आणि जाळपोळ कोणी केली ते दिसत आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
‘जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त, पण…’, महाजनांचं ट्विट
“गिरीश महाजन यांनी या घटनेवर ट्विटही केलं आहे. “काल रात्री जामनेरात दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असेच कुकृत्य संबंधित नराधमाने केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया भावनांना आवर घालावा. कोणीही कायदा हातात घेऊ नये. तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्यावे. दोषी व्यक्तीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, या दृष्टीने काटेकोर तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. संकटग्रस्त परिवाराला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याचीही सूचना मी प्रशासनाला केली आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
काल रात्री जामनेरात दिसून आलेला जनतेचा आक्रोश आणि संताप रास्त आहे. कोणत्याही संवेदनशील नागरिकाचा संताप अनावर व्हावा असेच कुकृत्य संबंधित नराधमाने केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त आणि व्यथित आहे. पण माझी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया भावनांना आवर…
— Girish Mahajan (@girishdmahajan) June 21, 2024
एकनाथ खडसे आणि अमित शाह यांची भेट?
“आमदार एकनाथ खडसे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली असेल. त्यांच्या भेटीकडे मी चांगल्या दृष्टीकोनाने पाहतो. भाजपमध्ये येण्यासंदर्भात अमित भाई आणि ते सांगू शकतील. काय चर्चा झाली मला याची कल्पना नाही. एकनाथ खडसे यांचा आणि माझा अशात नाही आणि कशातच संपर्क नाही”, असं स्पष्टीकरण गिरीश महाजन यांनी दिलं.
“नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेची आहे. त्यांनी पुन्हा उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपची जागा होती का किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवार दिला का? हा प्रश्न उद्भवत नाही. ती जागा महायुती लढवत आहे आणि महायुतीचे उमेदवार दराडे आहेत”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
गिरीश महाजन मराठा आरक्षणावर काय म्हणाले?
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. त्याआधी असे प्रयत्न कधी झाले नाही. 50-60 वर्ष राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी राजकारण केलं. ते एवढं बोलतात, त्यांनी काही प्रयत्न केला का? त्यांनी कधी कुणाला आरक्षण देऊ केलं का? उलट शरद पवार यांचे स्टेटमेंट आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायची गरज काय? आमची सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. आरक्षण देणार आहे तर ते सरकारच देईल. ज्यांना गरज आहे त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. आम्ही आरक्षणाच्या बाजूने असून कुणावर अन्याय होणार नाही ही सरकारची भूमिका आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
‘पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर नेलं पाहिजे’
“माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या मागणी बाबतीत मला माहित नाही. आमची मागणी आहे की पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर नेलं पाहिजे. काय अडचण आहे? नेत्या आहेत, ज्येष्ठ नेत्या आहेत. राज्यसभेवर त्यांची निवड झाली तर आनंदच आहे”, अशी भूमिका गिरीश महाजन यांनी मांडली.
महाजन उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेच्या निकालावर काय म्हणाले?
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर काही जणांकडून शंका उपस्थित केली जात आहे. त्यावरही गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “सगळ्यांनी थोडे शांत राहावं. निकाल लागलेला आहे. एकमेकांवर आरोप-दोषारोप करण्यापेक्षा मला वाटतं पुढच्या विधानसभेची तयारी करावी. आम्ही तीनही पक्ष एकत्र आहोत. विनाकारण काहीतरी बोलून उगाच मिठाचा खडा टाकण्यासारखं होईल. एकमेकांवर दोषारोप करणे एकमेकांना बोलणे हे काही योग्य नाही. आज बैठक आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलणार आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
महाजन ओबीसी आरक्षणावर काय म्हणाले?
“कुठलीही चर्चा असूद्या. मुद्दा असूद्या. त्यावर तोडगा निघत असतो. मार्ग निघत असतो. मात्र त्यावर चर्चा करायला हवी. ओबीसी आंदोलनामध्ये सुद्धा मी तुमचा प्रतिनिधी पाठवा, असे नवनाथ वाघमारे यांना म्हणालो. आपले तज्ज्ञ असतील असे पाच ते सहा लोक पाठवा चर्चेतून मार्ग निघेल”, असं गिरीश महाजन म्हणाले.