मुख्यमंत्र्यांचा फोन येताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना, मोठं काहीतरी घडतंय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येताच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईच्या दिशेला निघाले आहेत. विशेष म्हणजे गुलाबराव पाटील रेल्वे, विमानाने न निघता रस्ते मार्गाने मुंबईच्या दिशेला निघाले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील जळगावहून तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील हे विमान, रेल्वेने न जाता चारचाकी वाहनानेच बाय रोड मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून मंत्री गुलाबराव पाटील यांना तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. जळगावच्या एका कार्यक्रमात अर्थ खात नालायक असल्याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबईला बोलावून घेतले असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
याच वक्तव्यावरून गुलाबराव पाटील यांच्यावर महायुतीतील मित्र पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून टीका केली जात असून महायुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा करतात का? आणि काय खुलासा करतात? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
महायुतीत सारं काही आलबेल आहे ना?
शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांकडून वेगवेगळे वक्तव्य केले जात आहे. नुकतंच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. “राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत मंत्रिमंडळ बैठकीत एकत्र बसल्यानंतर बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात”, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतला जात होता. यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याबाबत वक्तव्य केल्याने महायुतीत नवा वाद सुरु झालाय. या दोन्ही घटनांमुळे महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या दोन घटनांनंतर आता मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना काय सूचना देतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.