अजितदादा सकाळी सकाळी सुद्धा उपमुख्यमंत्री झालेत, गुलाबराव पाटील यांचा चिमटा की अजून काही?; चर्चा तर होणारच!
अजित पवार यांनी नुकतंच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज प्रत्युत्तर दिलं.
“आम्ही त्यांचा आदर करतो. चारवेळा ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत. ते सकाळी सकाळी सुद्धा उपमुख्यमंत्री झाले आहेत”, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. अजित पवार यांनी नुकतंच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आत्मचरित्रावर आधारित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी सीनियर आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी आमदार सोबत आणल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं त्याचप्रमाणे मला मुख्यमंत्री केलं असतं तर मी संपूर्ण पक्ष आणला असता, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांच्या याच वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर देत जोरदार टोला लगावला.
“काही लोकांना रंग हा लकी असतो. त्यातल्या त्यात गुलाबी… आणि माझ्या नावात सुद्धा गुलाब आहे. शेवटी ज्याचात्याचा विषय आहे. मी काही ज्योतिषी नाही. आपल्याकडे आता जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार आहेत. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की प्रत्येकाने गुलाबी शर्ट घालावा म्हणून… हा विनोदाचा भाग आहे”, असा मिश्किल टोला गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.
सुप्रीम कोर्टाच्या कानउघाडणीवर गुलाबराव पाटील म्हणाले….
पुण्यातील जागेच्या याचिकेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारची कान उघाडणी केली आहे. लाडकी बहीण योजनेत द्यायला पैसे आहेत आणि जमिनीचा मोबदला द्यायला सरकारकडे पैसे नाहीत का? असं सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारलं आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलं. “सुप्रीम कोर्टाने काय निर्देश द्यावे हा त्यांचा विषय आहे. मात्र त्याकरता योजना थांबवणे हे कुठल्याच कायद्यात बसत नाही. त्यामुळे सरकार आहे. सरकार निश्चितच त्या विषयावर सुद्धा काहीतरी मार्ग काढेल. त्यामुळे सरकार सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश सुद्धा पाळेल आणि लाडक्या बहिणींना सुद्धा खूश करेल”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
सर्वच महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया का गेला नाही?
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अनेक महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया गेला नाही. यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. या चर्चांवर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “काहीच महिलांच्या खात्यामध्ये तपासणीसाठी एक रुपया टाकण्यात आला होता, सर्वच महिलांच्या खात्यात नव्हे. शंभर टक्के महिलांच्या खात्यावर एक रुपया टाकण्यात आलेला नाही”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.
भाजपची जळगावच्या सर्व जागांवर तयारी, गुलाबराव पाटील म्हणाले…
जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या संपूर्ण 11 मतदारसंघावर भाजपने विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गुलाबराव पाटील यांनी भूमिका मांडली. “आम्ही सुद्धा सर्व जागांवर तयारी केली आहे. जिल्ह्यामध्ये आपला पक्ष टिकवण्यासाठी आपल्या मतदारसंघा व्यतिरिक्त प्रत्येक कार्यकर्ता हा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पक्ष हा जागांवर दावा करत असतो. मात्र वरिष्ठ स्तरावरून जसे आदेश आले की त्या पद्धतीने काम करत असतो. आपण आपलं काम करत राहायचं. आमची महायुती पक्की आहे”, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.