‘ज्यांना जायचं त्यांनी जा, राहायचं त्यांनी राहा’, मंत्री गुलाबराव पाटील यांची कार्यकर्त्यांना तंबी
मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं वक्तव्य केलं. "आपल्यामध्ये सुद्धा काही शुक्राचार्य आहेत. मात्र ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहा. ज्यांना जायचं असेल त्यांनी निघून जा", अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना तंबी दिली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांना तंबी दिली. “मी 20 वर्षांपासून आमदार आहे. सात वर्षांपासून मंत्री आहे. मी आतापर्यंत सात-आठ मुख्यमंत्री पाहिले. पण सोळा-सोळा तास काम करणारा मुख्यमंत्री मी पाहिला असेल तर त्याचं काम त्याचं नाव आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तब्बल 13 वेळा जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा कोणी मुख्यमंत्री असेल तर त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. हे सांगताना मला अभिमान वाटतो. सर्वात जास्त काम एकनाथ शिंदे यांनी जर कोणतं केलं असेल तर ते महिलांच्या बाबतीत केला आहे. आपल्यामध्ये सुद्धा काही शुक्राचार्य आहेत. मात्र ज्यांना राहायचं असेल त्यांनी राहा. ज्यांना जायचं असेल त्यांनी निघून जा”, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना तंबी दिली.
“जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकणार नाही तोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार नाहीत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला झटायचं आहे. ज्यावेळी आम्ही बाहेर पडलो त्यावेळी लोकांनी मला गद्दार म्हटलं. खोके वाला म्हटलं. मात्र आम्ही बाहेर पडलो नसतो तर आज हजारो कोटी रुपयांची कामे झाली नसती. माझा फोन मी नेहमी सुरु ठेवतो. मला केव्हाही फोन लावा. मात्र चांगल्या कामासाठी लावा. अधिकाऱ्याला सांगितलं गाडी सोड, माझी जर सटकली तर बघ. मी फोनवर बोललो आणि कार्यकर्त्यांची गाडी सोडली. गाडी सोडण्याला महत्त्व नाही. माझ्या कार्यकर्त्याची कॉलर टाईट झाली त्याला महत्त्व आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
‘निवडणुकीत अंग काढून काम करा’
मंत्री गुलाबराव पाटील यांनी रात्री दीड वाजता एका कार्यकर्त्याने फोन केल्यानंतर त्याला प्रतिसाद दिल्याबाबतचा किस्सा भाषणात सांगितला. “मंत्री गुलाबराव पाटील यांचा शिक्का तुमच्यावर लागलेला आहे. निवडणुकीत अंग काढून काम करा किंवा अंग लावून काम करा. विजय झाला तर तुमचा. पराभव झाला तर मात्र फटाके हे तुमच्या घरासमोर फुटणार आहेत”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
‘युद्धामध्ये आपल्यासमोर कोणी आला त्याला…’
“मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या अफवा सुरू आहेत. कोणी म्हणतं ही जागा उबाठाला जाईल, तर कोणी म्हणतं, राष्ट्रवादी शरद पवार गटाला. आपल्यासमोर कोणी आलं तरी युद्ध आहे. युद्धामध्ये आपल्यासमोर कोणी आला त्याला चारी मुंड्या चीत करायचं आहे हेच आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे”, असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं.
“तुम्हाला आता फक्त 60 दिवस काम करायचे आहे. त्यानंतर पाच वर्ष मी हा सालदार शेताप्रमाणे तुमचं काम करायला तयार आहे, असं मी माझ्या मालकांना सांगायला या ठिकाणी आलो आहे. जनता माझी मालक आणि मी जनतेचा सालदार आहे. मी कधी तुम्हाला मंत्री असल्याचा बडेजाव दाखवला नाही. मात्र कार्यकर्ता जर मुंबईला कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर येत असेल तर तो गुलाबराव पाटील याच्या बंगल्यावर येतो हे मी या ठिकाणी कॉलर टाईट करून सांगतो”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.