मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात, ताफ्यातील पोलीस गाडीची धडक
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोन पोलीस आणि चंद्रकांत पाटील यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
जळगाव जिल्ह्यातून एक अनपेक्षित बातमी समोर येत आहे. जळगावच्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात चंद्रकांत पाटील हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची प्राथनिक तपासणी केली. चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन पोलीस कर्मचारीदेखील किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनादेखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडी धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात पोलिसांच्या गाडीचं बोनेटचं नुकसान झालं आहे. पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संबंधित घटनेची दखल तातडीने प्रशासन आणि पोलिसांकडून घेण्यात आली. चंद्रकांत पाटील हे अपघातातून सुखरुप बचावले आहेत.
गेल्या आठवड्यात रामदास आठवलेंच्या गाडीचा अपघात
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यादेखील गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. रामदास आठवले हे साताऱ्याच्या वाईहून मुंबईच्या दिशेला येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला टँकरने धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघातात सुदैवाने रामदास आठवले सुखरुप बचावले होते. या अपघातानंतर ते दुसऱ्या गाडीने मुंबईच्या दिशेला रवाना झाले होते.
राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. प्रत्येक पक्षात जोरदार हालचाली घडत आहेत. प्रत्येक पक्ष उमेदवार ठरवण्यापासून निवडणूक जिंकण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यामुळे प्रत्येक नेता हा कामात व्यस्त आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी वेगवेगळ्या भागातील दौरे आणि भेटीगाठी घेत आहेत. राजकीय नेतेमंडळींची सध्या प्रचंड धावपळ सुरु आहे. पण या धावपळीत स्वत:च्या जीवाची काळजी घेणं देखील तितकंच आवश्यक आहे. कारण लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकासाठी आशेचा एक किरण आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या जीवाची काळजी घेणं जास्त आवश्यक आहे.