‘एकनाथ खडसेंची औकात काय?’; आमदार चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांसमोर घणाघात
"एकनाथ खडसेंची औकात काय? यांची लायकी काय? मी मरेपर्यंत माझी कुस्ती यांच्यासोबत सुरू ठेवील", अशा शब्दांत आमदार चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. "मुक्ताईनगर मतदारसंघात साप सोडणारे खूप आहेत. 30 वर्षांत मतदारसंघात यांनी काहीच केलं नाही", अशी टीकादेखील त्यांनी केली.
रवी गोरे, Tv9 प्रतिनिधी, जळगाव | 4 मार्च 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 6 मंत्री आज मुक्ताईनगर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. मुंढोळदे ते सुलवाडी रावेरला जोडणाऱ्या महत्त्वकांशी पुलाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व मंत्री आणि विविध पक्षांचे नेते एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले. या कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उपस्थिती लावली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मंगळवारी जळगावच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवस जळगावात राजकीय वातावरण देखील तापण्याची चिन्हं आहेत. त्याला सुरुवात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी करुन दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांची थेट औकात काय? असा प्रश्न विचारला आहे.
चंद्रकांत पाटील यांची टीका नेमकी काय?
“एकनाथ खडसेंची औकात काय? यांची लायकी काय? मी मरेपर्यंत माझी कुस्ती यांच्यासोबत सुरू ठेवील”, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. “मुक्ताईनगर मतदारसंघात साप सोडणारे खूप आहेत. 30 वर्षांत मतदारसंघात यांनी काहीच केलं नाही. काहींना वाटतं की, हा महत्त्वाचा रावेरला जोडणारा पूल होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय साहेब आपण याकडे लक्ष द्यावं. केळी पिक विमाबाबत महाभागांनी संभ्रम निर्माण करून शेतकऱ्यांना वंचित ठेवलं”, असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला.
चंद्रकांत पाटील यांचा रोहिणी खडसेंवरही निशाणा
“या कार्यक्रमासाठी एक ऑडिओ क्लिप यांनी व्हायरल केली. आरोग्य सेविकांना 50 रुपये देऊन या कार्यक्रमाला बोलावलं. त्यामुळे उपस्थित एकाने तरी तसं सांगून दाखवावं. या कार्यक्रमाला निस्वार्थीपणे सर्व जमा झाले आहेत”, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावर निशाणा साधला.
रक्षा खडसे यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती
दरम्यान, रावेर लोकसभेच्या विद्यमान भाजपच्या खासदार रक्षा खडसे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. विशेष म्हणजे रक्षा खडसे यांचं नाव देखील पत्रिकेत नव्हतं. मात्र भाजपचे अनेक नेते, पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुक्ताईनगर मतदारसंघात 250 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन झालं.