महाराष्ट्र काँग्रेसमधील खळबळजनक बातमी, बडा नेता तडकाफडकी निलंबित, भाजपात प्रवेशाच्या चर्चांना उधाण
महाराष्ट्र काँग्रेसमधील मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षातील मोठा चेहरा आणि माजी खासदार उल्हास पाटील यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. उल्हास पाटील यांच्या निलंबनानंतर ते भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 22 जानेवारी 2024 : जळगावच्या राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. डॉ. उल्हास पाटील त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेस तर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे. एकाचवेळी काँग्रेसमधील तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नाना पटोले यांच्या या कारवाईनंतर डॉ. उल्हास पाटील , वर्षा पाटील तसेच त्यांच्या कन्या केतकी पाटील तिघे कुटुंबीय हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. उल्हास पाटील, पत्नी वर्षा पाटील आणि कन्या केतकी पाटील हे तिघेही लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
निलंबनाचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघांवर काँग्रेस पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीने तिघांनाही काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे पत्र देण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटना प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र तिघांनाही देण्यात आला आहे. हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय.
लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का
उल्हास पाटील हे जळगावातील बडे नेते आहेत. लोकसभा निवडणुकीआधी उल्हास पाटील यांनी भाजपात जाणं हे पक्षासाठी मोठं खिंडार आहे. उल्हास पाटील हे भाजपात सामील झाले तर भाजपची ताकद दुप्पटीने वाढणार आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत अशा काही घटना घडत असल्याने काँग्रेसला त्याचा मोठा धक्का बसू शकतो. महाविकास आघाडीकडून भाजपचा सामना करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. असं असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत अशा काही घटना घडत असल्याने भाजपचा सामना आता कसा केला जाईल? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.