Sharad Pawar | शरद पवार यांचा भाजपला डिवचणारा सवाल, पंतप्रधान मोदी काय उत्तर देणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत सरकारला खोचक सवाल केला आहे. त्यांच्या या प्रश्नावर आता सरकारकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जळगाव | 5 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जळगावात जाहीर सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या 9 वर्षांपासून सत्तेत आहेत. भाजपचं 9 वर्षांपासून सत्तेत आहे. पण भाजपने काय केलं? असा सवाल शरद पवार यांनी यावेळी केलं. यावेळी शरद पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
“आज काय चित्र दिसतंय? मोदी साहेबांचं राज्य आहे. मोदी साहेबांनी काय केलं? 9 वर्ष झाली. इतर राजकीय पक्ष फोडणे. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, फोडाफोडीचं राजकारण, एवढी एकच गोष्ट केली. दुसऱ्या बाजूने आपल्या हातात जी सत्ता आहे ती लोकांसाठी वापरायची. त्याच्याऐवजी सीबीआय, ईडी, खोटे खटले दाखल करायचे. काही संबंध नसताना काही महिने तुरुंगात टाकण्याचं काम केलं”, असा आरोप शरद पवारांनी केला.
“नवाब मलिक जुने नेते आहेत. त्यांना तुरुंगात टाकली. लोकांनी दिलेली सत्ता ही त्यांना सन्मानाने जगता कशी येईल यासाठी वापरायची असते. पण त्याऐवजी आज सत्तेचा गैरवापर भाजपने केलेला आहे”, असं शरद पवार म्हणाले. देशाचे मुख्यमंत्री आज भोपाळला गेले. त्यांनी तिथे जावून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका-टीप्पणी केली. त्यांनी सांगितलं की, जे वयस्कर लोकं आहेत, अनेकांची माहिती आमच्याकडे आहे”, असं शरद पवार म्हणाले.
‘कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरोधात…’
“माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नम्रपणे विनंती आहे, जर कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरोधात खटला भरा, त्याची चौकशी केली. पण हे चुकीचं ठरलं तर त्याची शिक्षा तुम्ही काय देणार हे संबंधितांना सांगा. खोटे आरोप करणे हे आपल्या हिताचं नाही”, असं शरद पवार म्हणाले.
“जालन्यात लाठीहल्ला केला. त्या लाठीहल्ल्याला काही कारण नव्हतं. त्याचा परिणाम महाराष्ट्रात बघायला मिळाला. शेतकरी, आया-बहिणींवर हल्ला करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल त्यांचा पराभव करु, हा निकाल आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे”, असं आवाहन शरद पवारांनी केलं.
शरद पवार काय-काय म्हणाले?
बऱ्याच दिवसांनी तुम्हा सगळ्यांसमोर कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बोलायची संधी मिळाली. यापूर्वी अनेकदा महाराष्ट्राचा इतिहास बघितला, खान्देशाचा इतिहास हा महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत अभिमानाचा आहे. इथे आल्यावर बहिणाबाई चौधरी, साने गुरुजी, ना. धों. महानोर यांचं स्मरण होतं. या सर्वांनी खान्देशाचा इतिहास हा समृद्ध करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. फैजपूर काँग्रेस याचा उल्लेख या ठिकाणी केला.
देशाच्या स्वातंत्र्याआधी काँग्रेसचं अधिवेशन अनेक ठिकाणी झालं. पण पहिलं अधिवेशन फैजपूर, खान्देशात झालं होतं. या अधिवेशनाला स्वत: महात्मा गांधी, पंडित नेहरु, मौलाना अब्दुल कलाम आझाद आले होते. संपूर्ण सभा ही स्वातंत्र्याच्या संबंधित होती.
जळगावने मधुकरराव चौधरींसारखे शिक्षण मंत्री दिले. प्रतिभा ताई पाटील सारख्या पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या, अनेकांची नावं घेता येतील. माझं भाग्य असं की मला या जिल्ह्यात एकेकाळी काम करायची संधी मिळाली. मी अनेक गावांमध्ये फिरलो.
अनेक संकट आहेत. एकेकाळी संबंध देशात आणि देशाच्या बाहेर उत्तम दर्जाची केळी ही खान्देशातून जात होती. एक काळ असा होता की, या ठिकाणी उत्तम शेतीचा आदर्श लोकांमध्ये बघायला मिळत होतं. आज एकप्रकारे दुष्काळाचं संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही, जनावरांना पाण्याची अडचण, पाण्याचे साठे कमी झाले, धरणात पाणी कमी, दुहेरी पेरणी केली तरी पिकं पडली. आणखी पाऊस येईल याची खात्री नाही.
आपल्या ही स्थिती बदलायची आहे. हे चित्र बदलू शकत नाही. राज्यकर्ते आपल्या हातातील सत्ता लोकांसाठी वापरली तर परिस्थिती बदलू शकते याची मला खात्री आहे. सत्ताधाऱ्यांना आज शेतकऱ्यांची चिंता नाही. जनावरांना पाणी नाही. त्याची चिंता नाही. चुकीच्या हातांमध्ये हे राज्य गेलेलं आहे. महाराष्ट्र असो किंवा अन्य राज्य असो, तरुणांमध्ये बेकारी आणि महागाई दिसत आहे.
गेल्या महिन्यात यवतमाळ जिल्ह्यात 15 दिवसांत 20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकरी कष्ट करणारा, घाम गाळणारा, लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडवणारा, आज आत्महत्येच्या टोकाचा निर्णय घेतो याचा अर्थ त्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितलं जात नाही. म्हणून आज सामूहिक शक्ती उभी करावी लागेल.
काहीतरी करायची आता गरज आहे. 1984-85 मध्ये अशीच अवस्था आहे. मला आठवतं आम्ही जळगावमध्ये बसूनच निर्णय घेतला होता. जळगाव ते नागपूर दिंडी काढले होते. पहिल्या दिवशी 20 ते 25 लोकं होते. पुढे लोकं दिंडीत सहभागी झाले. पण या दिंडीत पुढे लाखो नागरीक जोडले गेले होते. त्यामुळे इथला कष्टकरी हा लाचार, भेकड नाही. तो भीक मागत नाही. तो कष्टाची किंमत मागतो. कष्टाची, घामाची किंमत मिळत नसेल तर तो संघर्ष करतो. या संघर्षाचा इतिहास खान्देशाने यापूर्वी दाखवला ही गोष्ट आपल्याला मान्य करावं लागेल.