‘मी तुझ्यासारखा हमाल किंवा भंगार विकणारा नाही’, एकनाथ खडसे भाजप आमदारावर प्रचंड संतापले
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचं ऑडिट निघणार असल्याचं वक्तव्य केल्यानंतर खडसे चांगलेच संतापले आहेत. खडसेंनी मंगेश चव्हाण यांना "मी बाप दाद्यापासून श्रीमंत आहे. तुझ्यासारखा मी हमाल किंवा भंगार विकणारा नाही", अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगाव | 31 जुलै 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण हे आता आमनेसामने आले आहेत. मुक्ताईनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी पुन्हा नजमा तडवी यांची वर्णी लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 2021 मध्ये घेतलेला निर्णयाला राज्य सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे भाजपच्या नजमा तडवी यांनी पुन्हा नगराध्यपक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. नजमा तडवी यांनी जातवैधता प्रमाणपत्र वेळत जमा केलं नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. पण त्यांना जातवैधता प्रमाणपत्र वेळेत मिळू नये यासाठी काही जणांकडून प्रयत्न करण्यात आले, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला. यावेळी त्यांनी थेट एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला.
“खडसे या विषयाचे ऑडीट होणार, ते जनतेसमोर येणार, याशिवाय याला पूर्णविराम नाही”, असं वक्तव्य मंगेश चव्हाण यांनी केलं. मंगेश चव्हाण यांच्या याच वक्तव्यावर एकनाथ खडसे चांगलेच भडकले. “काय ऑडिट करायचं ते कर, तुला कोणी अडवलं बाबा? मी बाप दाद्यापासून श्रीमंत आहे तुझ्यासारखा मी हमाल किंवा भंगार विकणारा नाही. सरकार तुझं आहे. काय ऑडिट करायचं असेल ते कर. मी आतापर्यंत सर्व पाहून बसलोय ईडी वगैरे”, असं एकनाथ खडसे म्हणाले. “तुझी आधी किंमत आणि कुवत तपासून घे. मग माझ्यावर बोल”, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी सुनावलं.
“मुक्ताईनगर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांची अपात्रता ही नियमानुसार झाली असून भाजप नेते मात्र काहीही झाले की माझे नाव घेतात. काहीही झाले की त्यांना नाथाभाऊच दिसतात”, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
मंगेश चव्हाण नेमकं काय म्हणाले?
“एकनाथ खडसे यांचा या सगळ्या प्रकरणात कागदावर जरी रोल दिसत नसला तरी जात पडताळणी सर्टिफिकेट न मिळू देणं, त्याविरोधात कोर्टात अपील दाखल करणे, या सगळ्या प्रक्रियेचा कळीचा नारद कोण होता? सूत्रधार कोण होता? हे सगळं जनतेला माहिती आहे. कागदावर गिरीश चौधरी नावाचे व्यक्ती दिसत होते तरी ते कोण, कुणाच्या जवळचे, कुणाचे समर्थक, त्यांना नजमा तडवी या पायउतार व्हावं असं का वाटलं?”, असा सवाल मंगेश चव्हाण यांनी केला.
“मी आणि माझा परिवार अशी हुकूमशाही मिरवणाऱ्या एका नेत्याला चपराक आहे. त्या नेत्याने ज्या पद्धतीने वाटचाल केलीय आज त्यांची काय अवस्था होतेय ते आपण सर्वजण पाहतोय. आता ऑडिट सुरु झालंय. मी एकदा कमिटमेंट केलं तर मी स्वत:चं सुद्धा एकत नाही. खडसे या विषयाचं ऑडिट होणार ते जनतेसमोर येणार, याशिवाय या विषयाला पूर्णविराम नाही”, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला.