पार्थ पवार कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला, खडसेंचा अजित पवारांना खोचक टोला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पार्थ पवार आणि गजा मारणेच्या या भेटीवरुन एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
जळगाव | 25 जानेवारी 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजानन मारणे याची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गजानन मारणे याच्यावर अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याला याआधी अनेकवेळा अटक करण्यात आली आहे. पुण्यात टोळीयुद्ध आणि गजानन मारणे गँग हे नेहमी चर्चेत असतं. असं असताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्र्यांचा मुलगा या कुख्यात गुंडाला भेटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली आहे. “अजित पवार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा जोक आहे. किमान अजित पवार यांनी आपल्या मुलाला तरी समजावलं पाहिजे”, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
“अजित दादा कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलणं हाच मोठा विनोद आहे. अजित पवार कायदा आणि सुव्यवस्थेचं समर्थन करत असतील, कायदा-सुव्यवस्था चांगली आहे तर मग त्यांचे चिरंजीव पार्थ पवार गजानन मारणे याची भेट घेतात, हा गजानन मारणे टोळीचा प्रमुख आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कायदा-सुव्यवस्थेचा भंग केला जातो. असे त्याच्यावर सहा गुन्हे दाखल आहेत. अशांना भेटणं योग्य नाही. किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवावं”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
‘पार्थ पवार एखाद्या गुंडाला भेटले असं म्हणणं चुकीचं’
दुसरीकडे अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. “उपमुख्यमंत्री अजित पवार हे कायदा आणि सुव्यवस्था काटेकोरपणे राबवण्यासाठी काम करतात. गजानन मारणे यांच्या पत्नी जयश्री मारणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्या स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, पार्थ पवार तिकडे गेल्यावर त्यांचीदेखील भेट झाली आहे. गजानन मारणे यांची निर्दोष सुटका झाली आहे. त्यामुळे पार्थ पवार एखाद्या गुंडाला भेटले असं म्हणणं चुकीचं आहे. आमचे विरोधक जाणूनबुजून अशा चुकीच्या बातम्या पसरवत आहेत”, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे.
‘तुम्ही सत्तेत असताना तुमच्या जवळची लोकं सोडून गेली’
“एकेकाळी अजित पवारांच्या कामाचं कौतुक करणारी महाविकास आघाडी होती. तुम्ही सत्तेत असताना तुमच्या जवळची लोकं सोडून गेली आहेत. तुमच्या पक्षाकडे तुम्ही आता लक्ष द्या, तुमच्या लोकांवर झालेल्या आरोपांना कायदेशीर उत्तर कसं देता येईल यावर विचार करा. सकाळी उठून टोमणे मारण्याला लोकं आता कंटाळली आहेत”, अशा शब्दांत रुपाली पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.