शरद पवार गटाला जळगावात खिंडार, राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाने शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झटका दिला आहे. शरद पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आज राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावात शरद पवार गटाला खिंडार पडल्याची चर्चा आहे.
किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 30 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला जळगावात झटका दिला आहे. हा झटका जास्त महत्त्वाचा आहे. कारण राष्ट्रवादी पक्षात आधीच फूट पाडली गेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मनसेची महाराष्ट्रात ताकद वाढताना दिसत आहे. मनसे गाव-खेड्यापर्यंत पुन्हा एकदा जास्त घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे मनसे पक्षात कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या पक्षप्रवेशाला महत्त्व प्राप्त झालं आहे. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या प्रयत्नांनी शेकडो कार्यकर्त्यांनी आज मनसेत प्रवेश केला. मनसेतला हा पक्षप्रवेश जळगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय.
गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कुठलीही समस्या सुटत नसल्याने महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला, असं सीमा यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहर महिला सरचिटणीस सीमा गोसावी यांच्यासह महिला आणि तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला जळगाव शहरात खिंडार पडल्याची चर्चा आहे.
राज ठाकरे महायुतीसोबत जाणार?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही पक्षांसाठी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष जास्त महत्त्वाचा आहे. राज ठाकरे हे प्रवाभी नेते आहेत. त्यांचा महाराष्ट्रात खूप मोठा चाहता वर्ग आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये त्यांची जास्त क्रेझ आहे. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत आले तर त्यांचं स्वागतच करु, असं महायुतीचे नेते म्हणत आहेत. याशिवाय राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या वारंवार भेटीगाठी देखील घडून येत आहेत. नुकतीच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चाही झाली. त्यामुळे आगामी काळात काय-काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.