वैशाली सूर्यवंशी आमदार भावावर भडकल्या, किशोर आप्पा पाटील यांना दिला मोठा इशारा
आमदार किशोर आप्पा पाटील यांना त्यांच्या बहीण वैशाली सूर्यवंशी यांनी इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पत्रकाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यावरुन वैशाली सूर्यवंशी यांनी किशोर आप्पा पाटील यांना खडेबोल सुनावलं आहे.
जळगाव | 10 ऑगस्ट 2023 : पाचोऱ्यात आता भाऊ आणि बहीण आमनेसामने आल्याचं चित्र आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. शिवसेनेचे माजी आमदार आर.ओ. तात्या पाटील यांचे पुतणे आमदार किशोर पाटील यांनी एका स्थानिक पत्रकाराला केलेल्या शिवीगाळवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भडगावमध्ये एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची आणि हत्येची भयानक घटना घडली. या घटनेवरुन स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांनी वृत्तपत्रातून संबंधित प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.
संबंधित प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर संभाषण केलं होतं. त्यांनी आरोपीवर कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर पत्रकार संदीप महाजन यांनी चमकोगिरी म्हटलं होतं. तसेच संबंधित प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी पत्रकाराने केली होती. पण संदीप महाजन यांचे मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी हे शब्द किशोर आप्पा यांच्या जिव्हारी लागले आणि नवा वाद निर्माण झाला.
किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकाराला फोन केला आणि त्याला अतिशय अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली. विशेष म्हणजे हा वाद संपत नाही तेवढ्याच तीन-चार दिवसात या पत्रकाराला अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आली. पत्रकाराने किशोरी आप्पा पाटील यांच्याच माणसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. संबंधित प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. याच घटनेवरुन किशोर आप्पा यांच्या बहीण आणि आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या वैशाली सूर्यवंशी यांनी आपल्या भावावर नाव न घेता निशाणा साधला आहे.
वैशाली सूर्यवंशी नेमकं काय म्हणाल्या?
किशोर पाटील यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्यावरून बहीण आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी नाव न घेता आमदारांचे कान टोचले. पाचोऱ्याला सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आहे. हा वारसा लोकप्रतिनिधीने जपायला हवा, मतदार हे लोकप्रतिनिधीचे अनुकरण करतात. ही गुंडगिरी खपवून घेणार नाहीत, असाही टोला वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांचं नाव न घेता हाणला आहे. यापुढे उद्धव ठाकरेंवरही टीका कराल तर खबरदार, असा इशाराही वैशाली सूर्यवंशी यांनी दिलाय.
पाचोऱ्याच्या भाजप नेत्याकडूनही किशोर पाटील यांच्यावर निशाणा
दरम्यान, किशोर पाटील यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे भाजपचे अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत किशोर पाटील यांच्यावर टीका केली आहे. “पाचोरा-भडगाव या सुसंस्कृत मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांच्याकडून काळीमा फासणारी घटना घडली, अशी टीका त्यांनी केली. पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा मी भारतीय जनता पार्टीकडून जाहीर निषेध करतो”, अशी टीका अमोल शिंदे यांनी केली.
“पत्रकाराला केलेल्या शिवीगावरून आपल्याला आमदारांचे सुसंस्कृतपणा आणि चारित्र्य कळते. आमदार किशोर पाटील यांचा सुसंस्कृतपणा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. आमदार किशोर पाटील विधिमंडळाचे सदस्य आहेत. विधिमंडळाची पावित्र, मर्यादा त्यांनी ओळखली पाहिजे”, अशा शब्दांत अमोल शिंदे यांनी सुनावलं.
“पाचोरा-भडगाव मतदा संघातील व्यापारी वर्ग असेल, सर्वसामान्य नागरिक असतील हे सर्व पाहत आहेत. आमदार किशोर पाटील यांना सत्तेचा माज आणि पैशांची मस्ती आहे. या माध्यमातून सर्वांना भयभीत करण्याचे काम आणि दहशत तयार करून चुकीच्या पद्धतीने किशोर पाटील राजकारण करत आहेत. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करतात. याचा भारतीय जनता पार्टीकडून मी निषेध नोंदवतो”, अशी प्रतिक्रिया अमोल शिंदे यांनी दिली.