Raksha Khadase : सासऱ्यावर ईडीची कारवाई, सुनबाईंचं उत्तर ऐका, रक्षा खडसे म्हणतात…
केंद्राची कारवाई योग्य की अयोग्य याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ईडीकडून विनाकारण कोणालाही टार्गेट केले जात नाही, तर तक्रारी व पुराव्यांच्या आधारावरच ईडीकडून चौकशी केली जात असल्याची प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.
जळगाव : नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी सरकारची भूमिका व धोरणे तसेच योजनांविषयी माहिती देण्यासाठी जळगावात भाजप कार्यालयात खासदार रक्षा खडसे (Raksha Khadase) यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी एकनाथ खडसे (Eknath Khadase) यांच्या कारवाईबाबत प्रश्न विचारल्याने रक्षा खडसे या चांगल्या संभ्रमात पडल्या. एकनाथ खडसे यांच्यावर ईडीच्या कारवाई बाबत न्यायालयाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली खरी मात्र केंद्राची कारवाई योग्य की अयोग्य याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ईडीकडून विनाकारण कोणालाही टार्गेट केले जात नाही, तर तक्रारी व पुराव्यांच्या आधारावरच ईडीकडून चौकशी केली जात असल्याची प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.
एकीकडे सासरे, दुसरीकडे पक्ष
पत्रकारांच्या प्रश्नावर रक्षा खडसे या चांगल्याच धर्मसंकटात सापडल्या कारण एकीकडे सासऱ्याची बाजू तर दुसरीकडे पक्षाची बाजू, त्यामुळे रक्षा खडसे यांना चांगलाच संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. पण रक्षा खडसे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार ईडी कडून विनाकारण कोणालाही टार्गेट केले जात नाही. तसेच तक्रारी व पुराव्याच्या आधारावरच ईडी चौकशी करते असे मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केले. मात्र या मतानुसार एकनाथ खडसे यांच्यावर झालेली कारवाई ही योग्य ? असा अर्थ यातून काढला जातोय , मात्र या सर्व प्रकारामुळे एकीकडे सासरे दुसरीकडे पक्ष या दोन्ही बाजू बळकटपणे मांडण्याचा प्रयत्न मात्र रक्षा खडसे यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांवर अनेक आरोप
बिगर भाजपशासित राज्यात ईडी सुडाच्या भावनेने कारवाई करत आहे. तसेच ज्या राज्यात भाजपची सरकारं आहेत, तिथे ईडी किंवा सीबीआय किंवा इतर कोणतीही केंद्रीय तपास यंत्रणा त्याठिकाणी डोळेझाक करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सतत होत आहेत. भाजपने मात्र तपास यंत्रणांच्या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नाही, असे म्हणत वारंवार हे आरोप फेटाळून लावले आहेत. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात जशा प्रकारे ईडी आणि सीबीआयच्या कारवाई सुरू आहेत, त्यावरूनही रोजच राजकीय आरोप होत असतात. भाजपचे सरकार राज्यात आले नाही सल भाजपच्या मनात आहे. त्यामुळे हे सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून होते. तर पोलिसांचा गैरवापर हा राज्य सरकारकडून होतो असा आरोप भाजप करत आहे. मात्र या राजकीय आरोपात आज एका सुनेसाठी काही काळ संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले.